Ahilyanagar News: शहरातील मालपाणी इस्टेटजवळ युवकांच्या जमावाने निमोण येथील सरपंच संदीप देशमुख यांच्या वाहनाची जाळपोळ करून त्यातील तरुणांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून शहर पोलिसांनी थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, आमदार बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहायक भास्कर खेमनर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांच्यासह 50 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील निमोण येथील सरपंच संदीप देशमुख आपल्या मित्रांसह मोटारीतून माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या धांदरफळ येथील सभेसाठी गेले होते. सभा संपल्यानंतर ते गावी परतत असताना तालुक्यातील चिखली येथे जमावाने त्यांची मोटार अडवली व जाळपोळ केली.
याप्रकरणी थोरात, खेमनर, पापडेजा यांच्यासह सुरेश थोरात, सुभाष लक्ष्मण सांगळे, शाबीर शफीक तांबोळी, सिद्धार्थ थोरात, गोरक्ष रामदास घुगे, वैष्णव मुर्तडक, शेखर सोसे, शरद पावबाके, सौरभ कडलग, हर्षल रहाणे, सचिन रामदास दिघे, अनिल कांदळकर, विजय पवार, निखिल रामहरी कातोरे, गौरव डोंगरे, अजय फटांगरे, शुभम घुले आणि अन्य शंभर ते दीडशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे समजते. याबाबत अशोक बाबूराव वालझाडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
निमोण येथे घरात घुसून महिलेला मारहाण
दरम्यान, सरपंच संदीप देशमुख धांदरफळ येथे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सभेला गेल्याच्या रागातून जमावाने निमोण येथील घरी जाऊन त्यांच्या आईला जबर मारहाण केल्याची, तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन सोन्याचे दागिने व रोख रक्कम हिसकावून नेल्याच्या फिर्यादीवरून अकरा जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
शुक्रवारी रात्री जमावाने देशमुख यांची आई लताबाई भास्कर देशमुख (वय 66) यांना जबर मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील पाच तोळ्यांचा राणी हार, डोरले व रोख 10 हजार रुपये हिसकावून नेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
जखमी लताबाई यांना तातडीने घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाबीर तांबोळी, जुबेद तांबोळी, शेखर घुगे, सुयोग सांगळे, शफिक हमीद, मुस्ताकीम तांबोळी, गोरक्ष घुगे, इस्ताक पठाण, नद्दीम पठाण, अनिल घुगे, फैजान अत्तार अशा अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.