पारनेर: तालुक्यातील सेनापती बापट मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळावर पारनेर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पतसंस्थेचे अध्यक्ष रामदास भोसले, उपाध्यक्ष अण्णासाहेब औटी, कार्यकारी संचालक रामदास भोसले, तसेच शाखा व्यवस्थापक किरण शिंदे यांचा गुन्हा दाखल आलेल्यांमध्ये समावेश आहे.
या संदर्भात सुभाष आश्रूजी आग्रे (वय 75, रा. अळकुटी, ता. पारनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 23 एप्रिल 2010 रोजी पतसंस्थेच्या अळकुटी शाखेत आग्रे यांनी पत्नी शशिकला यांच्या नावे बचत खाते उघडून त्यात त्यांनी बचत केलेली रक्कम जमा केली होती. स्वतः सुभाष आग्रे यांनीही मार्च 2025मध्ये बचत खाते उघडले. (Latest Ahilyanagar News)
शशिकला आग्रे यांच्या खात्यावर 1 लाख 50 हजारांची रक्कम असल्याने शाखा व्यवस्थापक किरण शिंदे, चेअरमन रामदास भोसले, कार्यकारी संचालक रामदास झंजाड यांनी इतर बँकांपेक्षा जास्त व्याज देण्याची ग्वाही दिल्याने शशिकला यांच्या खात्यावरील 1 लाख रुपये रकमेची 1 वर्षासाठी मुदत ठेव सन 2021मध्ये करण्यात आली.
9 टक्के व्याज देण्यात आल्याने आग्रे यांनी शशिकला यांच्या खात्यावरील शिल्लक रक्कम रुपये 50 हजारांचीही पतसंस्थेत ठेव ठेवली. सन 2022मध्ये दोन्ही मुदत ठेव पावत्यांची मुदत संपल्याने सुभाष आग्रे व शशिकला आग्रे यांनी अळकुटी शाखेत जाऊन पैशांची मागणी केली असता संस्था तुम्हाला चांगला व्याजदर देत आहे, तुम्ही मुदत पूर्ण झालेल्या पावत्यांच्या पुन्हा 181 दिवसांसाठी मुदत ठेव पावत्या करा, अशी गळ व्यवस्थापक किरण शिंदे याने घातली.
शिंदे याच्यावर विश्वास ठेवून आग्रे दाम्पत्याने त्या रकमेच्या पुन्हा मुदत ठेव पावत्या केल्या, चांगला परतावा देऊ असे सांगण्यात येत असल्याने आग्रे दाम्पत्य पुन्हा पुन्हा पावत्यांचे नूतनीकरण करत होते.
उडवा-उडवीची उत्तरे देत वेळकाढूपणा
मुदत ठेव पावत्यांची मुदत संपल्यानंतरही व्यवस्थापक शिंदे याने पैसे देण्यास असमर्थता दर्शविली. इतर खातेदारांनाही त्यांचे बचत खाते, ठेव पावत्यांचे पैसेही मिळत नव्हते. त्यामुळे आग्रे यांना शंका आल्याने त्यांनी संस्थेच्या पारनेर येथील मुख्य कार्यालयात जाऊन चेअरमन रामदास भोसले, कार्यकारी संचालक रामदास झंजाड व इतर संचालकांकडे मुदत ठेवीचे 1 लाख 50 हजार रुपये व्याजासह, तसेच बचत खात्यातील 2 लाखांंची मागणी केली असता सर्वांनी उडवा-उडवीची उत्तरे देत वेळकाढूपणा केला असल्याचे तक्रारदार यांनी म्हटले आहे.
थांबण्याचा निर्णय आला अंगाशी
डिसेंबर सन 2023मध्ये सुभाष आग्रे यांना पैशांची अचानक आवश्यकता भासल्याने पत्नीच्या नावे असलेली मुदत ठेवीची, तसेच बचत खात्यावर जमा असलेली रक्कम मिळावी यासाठी शाखा व्यवस्थापक किरण शिंदे याच्याकडे मागणी केली. त्या वेळी शिंदे याने सध्या पतसंस्थेत तुम्हाला देण्याइतपत पैसे नाहीत. तुम्हाला नंतर पैसे देऊ. तुम्हाला थोडे दिवस थांबावे लागेल. आग्रे दाम्पत्याने शिंदे याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून थांबण्याचा निर्णय घेतला.