नगर : जिल्ह्यातील 758 ग्रामपंचायतींची आज सोमवारी मुदत संपणार आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींचा कारभार आजपासून विस्तार अधिकारी दर्जाच्या प्रशासकांच्या हातात दिला जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनात सर्वच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी प्रशासकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे गट आणि गणातील इच्छुक डोळे लावून बसले आहेत. त्यातच, आता 758 ग्रामपंचायतींच्याही मुदती संपल्या आहेत. संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य आज सोमवारपासून माजी होणार आहे. त्यामुळे आजपासून सरपंचांचे अधिकार हे प्रशासकांकडे दिले जाणार आहेत. यापूर्वी डिसेंबर 2025 अखेर मुदत संपलेल्या 114 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबल्याने त्या ठिकाणी अगोदरच प्रशासक नियुक्ती करण्यात आली आहे. आता आणखी 758 ग्रामपंचायतींवर प्रशासन नेमले जाणार आहेत.
कृषी, शिक्षण, पशुसंवर्धन विभागाचे विस्तार अधिकारी, पाणी पुरवठा उपअभियंता, तसेच अंगणवाडी पर्यवेक्षक अशा संवर्गातील अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नियुक्त्या दिल्या आहेत.
दरम्यान, मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकानंतरच ग्रामपंचायती जाहीर होण्याची शक्यता असल्याने किमान तीन महिने तरी ग्रामपंचायतींच्या इच्छुकांना वाट पहावी लागणार आहे.
अकोले 51
संगमनेर 94
श्रीरामपूर 27
कोपरगाव 29
राहाता 25
राहुरी 44
नेवासा 59
शेवगाव 48
पाथर्डी 78
जामखेड 49
श्रीगोंदा 56
कर्जत 54