नगर तालुका: नगर तालुक्यातील जेऊर येथील कत्तरखान्यावर रविवार (दि.7 ) एमआयडीसी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये चार लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत दोन आरोपींना अटक केली. यावेळी 500 किलो गोमांस जप्त करीत कत्तलीसाठी डांबून ठेवण्यात आलेल्या 5 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली.
एमआयडीसीचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांना जेऊर गावात मुनाफ चाँद शेख आणि मुजफ्फर चाँद शेख यांच्या घरामागील गोठ्यात कत्तल केलेले गोवंशीय मांस, तसेच गोवंशीय जनावरे डांबून ठेवल्याची माहिती मिळाली होती. (Latest Ahilyanagar News)
त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक मनोज मोंढे, कॉन्स्टेबल भगवान वंजारी, सुरेश सानप, ज्ञानेश्वर तांदळे यांच्या पथकाने सदर ठिकाणी पंचासमक्ष छापा टाकला. सलमान अजीज शेख ( वय 25, घासगल्ली, कोठला, नगर) यास ताब्यात घेतले. सलमान शेख याच्याकडे चौकशी केली असता, त्याने त्याच्या साथीदारांची नावे ईकलास शेख, मुनाफ चाँद शेख, मुजफ्फर चाँद शेख, अस्लम खलील कुरेशी अशी सांगितली.
घटनास्थळावरून 500 किलो गोवंशीय मांस, पाच गोवंशीय जातीची जनावरे तसेच वाहने, कत्तलीसाठी लागणारे साहित्य असा एकूण चार लाख 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांकडून क्रॉस चेकिंग! रात्री त्याच परिसरात मोठे गोमांस जप्त !
जेऊर परिसरात रविवारी दुपारी गोमांस व गोवंशीय जनावरांची सुटका करीत एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली. मोठा पोलिस बंदोबस्त होता. रात्री नऊ वाजता परत त्याच परिसरात एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला असता, मोठ्या प्रमाणात गोमांस जप्त करण्यात आले आहे.
तसेच गोवंशीय कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांची सुटका देखील करण्यात आली आहे. दुपारी टाकलेल्या छाप्यानंतर पुन्हा रात्री त्याच परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यात आल्याने गोवंशीय हत्या करणार्यांना पोलिसांचा धाक नसल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
एमआयडीसी पोलिसांनी दुपारी छापा टाकल्यानंतर पुन्हा रात्री नऊ वाजता त्याच ठिकाणी छापा टाकल्याने पोलिसांनीही कायद्याचा धाक असल्याचे दाखवून दिले आहे. पोलिसांच्या क्रॉस चेकिंगच्या भूमिकेचे ग्रामस्थ कौतुक करत आहेत तर अवैध कत्तल करणार्यांचा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
परिसरात गोवंशीय जनावरांची वाहतूक, तसेच कत्तल करण्याबाबतची माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. पोलिसांचे बारीक लक्ष आहे. कायदा हातात घेणार्यांची गय करण्यात येणार नाही.- माणिक चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक