राहुरीतील इसमाविरुद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल  File Photo
अहिल्यानगर

Shrirampur Fraud News: गरजू महिलांची 87 हजार रुपयांची फसवणूक! व्यवसायासाठी शिलाई मशिन देण्याचे आमिष

Woman cheated by promising to give them a sewing machine: राहुरीतील इसमाविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर : गरजू महिलांना व्यवसाय उभारणीसाठी हप्त्यावर शिलाई मशीन देण्याचे अमिष दाखवून, तालुक्यातील मातापूर येथील 40 महिलांची 87 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघड झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी मनिषा श्रीनाथ दोंड (25, रा. मातापूर, ता. श्रीरामपूर) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी कल्याण दामोधर ढवण (रा. मल्हारवाडी रोड, काळे आखाडा, ढोकणे इंग्लिश स्कूलशेजारी, राहुरी) या इसमाविरोधात श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि. 15 जून 2024) रोजी शुभांगी अभिजित निपुंगे या महिलेने राहुरी येथील युवा स्कील सोशल वेलफेअर फाऊंडेशनचे चेअरमन कल्याण ढवण यांच्याशी मनिषा दोंड यांची ओळख करून दिली. यानंतर ढवण याने दोंड यांना सांगितले की, ‘आम्ही सामाजिक कार्य करतो. गरजू महिलांना व्यवसाय उभारणीसाठी शिलाई मशीन उपलब्ध करून देतो. या अनुषंगाने ढवण यांनी गावातील महिलांना एकत्र करून, प्रत्येक 2 हजार रुपये भरुन, शिलाई मशिन प्राप्त झाल्यानंतर उर्वरीत 2, 500 रुपये हप्त्याने भरा,’ असे सांगत, महिलांची संमती घेवून, त्यांच्याकडून फार्म भरून घ्या.’ यामुळे गावातील गरजू महिलांनी दोंड यांच्या बँक खात्यावर शिलाई मशीनसाठी रक्कम जमा केली.

नंतर शिलाई मशीनसाठी, दोंड व त्यांच्या पतीच्या बँक खात्यावरून जमा केलेली 87 हजारांची रक्कम ऑनलाईन व रोख स्वरुपात ऑगस्ट 2024 ते सप्टेंबर 2024 दरम्यान कल्याण ढवण यांना दिली. रक्कम प्राप्त झाल्यानंतर, ढवण म्हणाला की, ‘पंधरा दिवसात शिलाई मशीन मिळतील,’ मात्र दोंडसह पतीने वेळोवेळी पाठपुरावा करूनही ढवण याच्याकडून शिलाई मशीन मिळाल्या नाही. ‘विधानसभेची आचार संहिता व दिवाळी, नाताळच्या सुट्ट्या आहेत,’ अशी थातुर-मातुर कारणे सांगत, ढवण याने मशीन देण्यास टाळाटाळ केली. याबाबत दोंड यांनी विविध मार्गाने वारंवार मागणी करूनही, शिलाई मशीन अथवा घेतलेली 87 हजार रुपयांची रक्कम परत केली नाही, असे दोंड यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात कल्याण दामोधर ढवण याच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थातुर-मातुर कारणे सांगत केली टाळाटाळ!

मातापुरातील तब्बल 40 महिलांकडून 87 हजार रुपये घेवून, राहुरी येथील कल्याण दामोधर ढवण या इसमाने ‘पंधरा दिवसात शिलाई मशीन मिळतील,’ असे आश्वासन त्यांना दिले, मात्र वेळोवेळी पाठपुरावा करूनही ढवण याने शिलाई मशीन अथवा रोकड परत केली नाही. ‘विधानसभेची आचार संहिता व दिवाळी, नाताळच्या सुट्ट्या आहेत,’ अशी थातुर-मातुर कारणे सांगत, त्याने मशीन देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध श्रीरामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT