सोनई: नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे कत्तलीसाठी आणलेली 26 जनावरे अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन 33 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी पाचजणांवर सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसायावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहे. पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना घोडेगाव येथील फिरोज शेख याने कत्तलीसाठी जनावरे आणल्याची गुप्त माहिती मिळताच त्यांनी त्वरित गुन्हे शाखेच्या पथकाला छापा टाकण्याचे सूचना दिल्या. (Latest Ahilyanagar News)
सदर ठिकाणी छापा टाकला असता, फिरोज रशीद शेख (वय 36, रा. घोडेगाव), लाला उर्फ आफताब हरून शेख (वय 28), शुभम बाबासाहेब पुंड (वय 25, रा. माळीचिंचोरा) या तिघांना ताब्यात घेतले. कारवाई दरम्यान भारत भाऊसाहेब शहाराव (रा. फत्तेपूर) व जुनेद शेख (रा. मुंगी) हे दोघे पळून गेले. एम एच 11 सीएच 8599 या ट्रकची पंचासमक्ष पाहणीत 7 संकरिता गायी भरलेल्या आढळून आल्या. तसेच फिरोज शेख याच्या राहत्या घरासमोरील कंपाऊंडच्या आत 19संकरित गायी त्यात खिलार जातीचा बैल पाणी-चाऱ्याविना डांबवून ठेवला होता.
या जनावरांची खरेदीचे बाजार पावत्याबाबत विचारपूस केली असता, त्याने कोणत्याही प्रकारची पावती नसल्याचे सांगून ही जनावर माझीच असल्याचे सांगितले. कारवाईत 12 लाख 50 हजार रुपयांची 25 संकरित लहान-मोठ्या गायी, 50 हजार रुपये किंमतीचा खिलार बैल व 20 लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा ट्रक असा एकूण 33 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिस नाईक सोमनाथ झांबरे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार डी.एम. गावडे पुढील तपास करीत आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या आदेशाने सहायक पोलिस निरीक्षक हरीष भोये, सहायक फौजदार रमेश गांगुर्डे,हवालदार हृदय घोडके, लक्ष्मण खोकले, गणेश लोंढे संतोष खैरे, सुयोग सुपेकर, शामसुंदर जाधव, भीमराज खर्से, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, जालिंदर माने, प्रमोद जाधव, सारिका दरेकर, सुवर्णा गोडसे, उमाकांत गावडे, अरुण मोरे यांनी ही कारवाई केली आहे.