अकोले : गेल्या दहा - बारा दिवसांपासून राजूर गावामध्ये दूषित पाणी पिल्याने काविळमुळे एका तरुणीचा जीव गेला, तर तब्बल 244 रुग्णांना काविळ झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. अजुनही राजूर गावातील काविळचे रुग्ण वाढतेच आहेत. दरम्यान, राजुर गावाला पाणीपुरवठा करणारे प्रवरा पात्रातील पाणी व जॅकवेलतील पाण्याचे नमुने तपासणीत पिण्यासाठी अयोग्य असल्याची माहिती समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
आदिवासी विभागाचे केंद्र बिंंदु असलेल्या राजूर गावात शासकीय, निमशासकीय कार्यालये, महाविद्यालये तसेच नोकरीनिमित्ताने नागरिक वास्तव्यास आहेत. राजूर गावाची लोकसंख्या सुमारे 16 हजाराच्या दरम्यान आहे. गावाला पाणीपुरवठा करणार्या नळपाणी पुरवठा योजनेच्या टाकीची पाणी साठवण क्षमता 3 लाख लीटर आहे. दररोज राजूर गावाला पाणी पुरवठा होण्यासाठी गावात तीन लहान पाण्याच्या टाक्याच्या माध्यमातून वाड्या - वस्तीवरही पाणी पुरवठा करण्यात येत असतो. परंतु राजूर गावाला नळपाणी पुरवठा करणार्या पाण्याची टाकी दोन वर्षांत धुतलेली नाही.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजे, आरोग्य अधिकारी डॉ. शामकांत शेटे यांनी स्वतः उभे राहुन कर्मचा-याकडुन पाण्याची टाकीची स्वच्छता करुन जलशुद्धीकरण केंद्र सुरु केले. तर पाण्यात तुरटी, मेडिक्लोर टाकुन पाण्याचे नमुने घेण्यात आले. पाण्याच्या टाकीतील पाणी पिण्यासाठी योग्य असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले आहेत. परंतु राजूरला पाणी पुरवठा करणार्या प्रवरा नदीपात्राबरोबरच जॅकवेलतील पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे पाणी नमुने तपासणीवरुन स्पष्ट झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
राजूरचे सुमारे 244 रुग्ण खाजगी व सरकारी दवाखान्यातून उपचार घेत असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. निवडणुकीत मतांचा जोगवा मागणारे राजकीय नेते मधुकर तळपाडे, मारुती मेंगाळ, अमित भांगरे, माजी आमदार वैभव पिचड, खा.भाऊसाहेब वाकचौरे अद्यापही काविळ बांधित राजूरकडे फिरकलेचं नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आरोग्य पर्यवेक्षक डॉ. विनोद भागोराव भिसे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देवून साथरोग नियंत्रण कार्यक्रम राबविणे गरजेचे होते. राजुर गावामध्ये कावीळ आजाराची साथ पसरलेली असताना तसेच रुग्णसंख्या वाढत असलेचे कळविले नाही. तसेच भिसे यांना वेळोवेळी सुचना देवूनही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करुन जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकार्यांच्या भेटी दरम्यान अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबीत करीत असल्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर यांनी काढला आहे.