नगरमध्ये 20 लाखांचे अंमली पदार्थ जप्त; ओडिशातून तस्करी Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Crime: नगरमध्ये 20 लाखांचे अंमली पदार्थ जप्त; ओडिशातून तस्करी

जिल्ह्यातील सात ग्राहकांसह दहा जणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

नगर: ओडिशातून जिल्ह्यात सुरू असलेली गांजाची मोठी तस्करी पोलिसांनी सापळा रचून उघडकीस आणली असून, एका मोठ्या ट्रकमधून तब्बल वीस लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

केडगाव शिवारात रात्री साडेदहा वाजता सापळा लावून ही कारवाई करण्यात आली. एका 14 टायर ट्रकमधून गांजा येणार असल्याची आणि जिल्ह्यातील खरेदीदारांना त्या ठिकाणी मागणीप्रमाणे गांजाची विक्री केली जाणार असल्याची खबर कोतवाली पोलिसांना मिळाली. (Latest Ahilyanagar News)

त्यानंतर पोलिस उपअधीक्षक अमोल भारती स्वतः अंधारात पथकासमवेत सापळा लावून दबा धरून बसले आणि तब्बल 20 लाख रुपयांचा गांजा जप्त करून 10 जणांना बेड्या ठोकल्या. गांजा तस्करीचा मास्टर माईंड हा ओडिसात बसलेला असून, त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी नगरचे पथक लवकरच रवाना होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार अवैध धंदे रडारवर असतानाच, कोतवाली हद्दीतील केडगाव शिवारात गांजाची तस्करी होणार असल्याची पक्की खबर पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांनी याबाबत तत्काळ दखल घेतली. ते स्वतःही कारवाईसाठी परिसरात पोहचले.

भारती यांनी केडगाव बायपास रोडवरील टोलनाक्याजवळ भारत केंद्र वाहन शोरूम परिसरात पोलिसांना वेगवेगळ्या पथकांत विभागून अंधारात दबा धरून बसण्यास सांगितले. रात्री 10.40च्या सुमारास दुसरी खबर आली, की एक मालट्रक संशयास्पदरित्या टोलनाका ओलांडून पुढे येत आहे. पोलिसांनी तो ट्रक ताब्यात घेतला.

वाहतूक स्टीलची, पण तस्करी गांजाची!

ट्रकमध्ये (एमएच 16 सीजी 0452) चालकासह अन्य दोघे होते. पोलिसांनी विचारणा करताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ट्रकमध्ये मागील बाजूस लोखंडी पोल, अँगल होते. मात्र आत पाहिले असता कॅबीनवर पांढर्‍या रंगाच्या चार गोण्या बारदानाखाली झाकलेल्या दिसल्या.

त्यात खाकी रंगाच्या चिकटटेपमध्ये बिटाच्या आकाराची पाकिटे होती. त्यात हा गांजा भरलेला होता. ट्रक नगरचाच होता. ट्रकचालक संतोष प्रकाश दानवे (रा. वाळवणे, ता. पारनेर) याने बहिरमपूर, (ओडिसा) येथून गांजा आणला असून, तो घेण्यासाठी काही लोक टोलनाक्याजवळच मोकळ्या ठिकाणी येणार असल्याची कबुली दिली.

गांजा खरेदीसाठी मोबाईलद्वारे लोकेशन

ट्रकचालकाच्या फोनवर एका इसमाचा फोन आला व टोलनाक्याजवळ यायला किती वेळ आहे, माल न्यायला कधी येऊ, अशी विचारणा झाली. त्या वेळी अमोल भारती यांनी प्रसंगावधान राखत समोरच्या इसमाला माल घेण्यास येण्याबाबत कळविण्यास ट्रकचालकाला सांगितले. जवळच पोलिसांचा फौजफाटा अंधारात दबा धरून बसला होता.

काही वेळात एक लाल रंगाची लहान कार (एमएस 16 सीक्यू 2786) व काळ्या रंगाची आलिशान कार (एमएच 12 सीडी 1127) अशा दोन कार आल्या. त्यातील व्यक्ती ट्रकची नंबरवरून खात्री करत असतानाच साध्या वेशातील पोलिसांनी दोन्ही कार व त्यातील सात ताब्यात घेतले.

आठ आरोपी नगरचे

कोतवाली पोलिसांनी ट्रकमधील तिघे, तसेच माल नेण्यासाठी दोन वाहनांतून आलेल्या सात जणांना ताब्यात घेतले. ट्रकचालक संतोष प्रकाश दानवे, तसेच त्याच्यासोबत असलेले संदीप बाग (रा. लेद्रीमाल, जि. बेथ, ओडिशा), दिलीप भेसरी (रा. घुडाधार, जि. बेनिका, ओडिशा) आणि माल घेण्यासाठी आलेले गणेश भोसले (रा. जवखेड खालसा), प्रशांत मिरपगार (रा. कामत शिगये, दोघे ता. पाथर्डी), प्रदीप डहाणे, भगवान डहाणे, अक्षय डहाणे, ईश्वर गायकवाड (चौघे रा. पिंपळगाव लांडगा, ता.नगर), प्रमोद क्षेत्रे (रा. आलमगीर, भिंगार) अशी त्यांची नावे आहेत.

त्यांच्या ताब्यातून 19 लाख 90 हजार रुपये किमतीचा गांजा, तीन वाहने, ट्रकमधील तीस टन लोखंडी पोल अँगल, 11 मोबाईल असा एकूण 88 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू होती. सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT