Eco Friendly Ganpati Idol Pudhari
अहिल्यानगर

Eco Friendly Ganpati Idol: रद्दीतून साकारला ‘जय भवानी’ मानाचा गणपती; मतिमंद विद्यार्थ्यांच्या कलाकृतीला अनोखे रूप

संत वामनभाऊ तरुण मंडळाने १११ किलो रद्दी कागदाचा वापर करून ‘जय भवानी’ मानाच्या दुसऱ्या गणपतीची पर्यावरणपूरक प्रतिकृती साकारली. बालगृहातील विद्यार्थ्यांनी मूर्तीकलेत सहभाग घेतला.

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: शहरातील संत वामनभाऊ तरुण मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारा अनोखा उपक्रम राबविला आहे. मंडळाने तब्बल १११ किलो रद्दी कागदाचा वापर करून ‘जय भवानी’ मानाच्या दुसऱ्या गणपतीची प्रतिकृती साकारली आहे.

सुमारे तीन ते साडेतीन फूट उंचीची ही गणेशमूर्ती पर्यावरणपूरक असून, विशेष म्हणजे नवोदय ग्रामीण नागरी विकास प्रतिष्ठान संचलित अनाथ मतिमंद मुलांच्या बालगृहातील विद्यार्थ्यांनी हस्तकला, शिल्पकला व मूर्तीकलेच्या माध्यमातून ही मूर्ती साकारण्यात सहभाग घेतला आहे.

मंडळाचे अध्यक्ष सचिन नागापुरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला. रद्दी कागदाचा पुनर्वापर करून गणेशमूर्ती साकारण्यामागे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याबरोबरच विशेष मुलांमधील कलागुणांना व्यासपीठ देण्याचा उद्देश आहे. त्यामुळे या उपक्रमातून ‘रद्दीतून कलाकृती आणि विशेष विद्यार्थ्यांच्या कलेला संधी’ असा दुहेरी संदेश देण्यात आला आहे.

मंडळातील सदस्य, तसेच बालगृहातील विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे मूर्ती तयार करण्याचे काम केले. संस्थेच्या अध्यक्षा अनिता अशोक निऱ्हाळी, प्रताप निऱ्हाळी, मुख्याध्यापक सचिन तरवडे व कलाशिक्षक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मूर्तीकलेत सहभाग घेतला. तसेच ससे, तुजारे व अशोक जेधे यांचे विशेष सहकार्य लाभले.

त्यामुळे गणेशमूर्ती तयार करण्याचा हा उपक्रम केवळ पर्यावरणपूरक न राहता समावेशकतेचा आणि सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श ठरला आहे.या उपक्रमासाठी माजी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, संतोष गायकवाड, धनंजय बडे, अनिल ढाकणे, पोलिस निरीक्षक किरण खेडकर व नितीन गर्जे यांचे मार्गदर्शन लाभले.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, पर्यावरणपूरक व विधायक उपक्रम राबविण्याचा मंडळाचा प्रयत्न यंदाही कायम राहिला असून, रद्दी कागदापासून साकारलेली ही गणेशमूर्ती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT