उत्तर महाराष्ट्र

श्रद्धांजलीचे पाहता बॅनर; ‘त्या’ दिवसांचा दाटे गहिवर

गणेश सोनवणे

नाशिक : सतीश डोंगरे
'मृत्यूचे तांडव' काय असते, याचा प्रत्यक्ष अनुभव एप्रिल 2021 या महिन्यात प्रत्येकालाच आला. हा महिना आठवला तरी, अंगावर काटा उभा राहतो. घराघरात आक्रोश, वेदना अन् थरकाप उडविणार्‍या वार्ता चोहीकडून कानावर पडायच्या. टीव्ही लावला किंवा सोशल मीडियात डोकावून बघितले तरी, भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट मन सुन्न करायच्या. घराबाहेर पाऊल टाकले तर चौकाचौकांत
'जाण्याची ही वेळ नव्हती,
थांबण्यासाठी खूप होते,
तरीही ध्यानीमनी नसताना आम्हाला सोडून गेलास
यापेक्षा दुर्दैव ते काय हो…???'
रडविले तू आम्हाला… देवापुढे खरंच कुणाचं चालेना…!'
अशा अशायचे बॅनर नजरेस पडायचे. काल, परवापर्यंत डोळ्यासमोर असणारी व्यक्ती अचानक जग सोडून गेल्याचे समजायचे. या वेदनादायी आठवणींना आज वर्ष होत आहे. शहराच्या बहुतांश भागांत प्रथम पुण्यस्मरणाचे बॅनर झळकत असल्याने वर्षभराच्या वेदनादायी आठवणी पुन्हा उभ्या राहत आहेत.
'अजूनही होतो भास
तुम्ही आहात जवळपास
शांती लाभो तुमच्या आत्म्यास
हीच प्रार्थना परमेश्वरास'
बॅनरवरील या ओळी मन सुन्न करीत आहेत. कोरोनाची दुसरी लाट आली अन् होत्याचे नव्हते झाले. अनेक लहानग्यांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हिरावून घेतले. कुटुंबातील कर्तापुरुषच सोडून गेल्याने, कित्येकांचे संसार उघडे पडले. एप्रिल 2021 या महिन्यात मृत्यूचा हा तांडव सर्वत्र सुरू होता. आता या घटनेला वर्ष होत आहे. अनेक कुटुंबे या दु:खातून अद्यापही सावरलेले नाहीत. आपल्या आप्तस्वकीयांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शहरातील बहुतांश भागांत सध्या प्रथम पुण्यस्मरणाचे बॅनर झळकत आहेत. हे बॅनर बघून परिसरातील लोकांनाही 'त्या' व्यक्तीचे स्मरण होत आहे. मात्र, त्याचबरोबर एप्रिल 2021 या महिन्यातील कटू आठवणींनी अंगावर शहारेही उभे राहत आहेत.

एकाच महिन्यात 2,883 मृत्यू
कोरोनाची पहिली लाट सौम्य असल्याने, मृत्यूदर नगण्य होता. मात्र, दुसर्‍या लाटेत कोरोनाने असा काही हाहाकार माजवला की, सर्वत्र मृत्यूचे तांडव बघावयास मिळाले. स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास जागा नव्हती. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये पाच ते सहा दिवस मृतदेह पडून असायचे. बर्‍याच रुग्णांनी तर उपचाराअभावी रुग्णालयाच्या दारात जीव सोडले. प्रशासकीय नोंदीनुसार, एकट्या एप्रिल 2021 या महिन्यात जिल्ह्यातील तब्बल 2,883 रुग्णांचा बळी कोरोनाने घेतला.

वडिलांचा बॅनरवर फोटो अन् घालमेल
त्याचे वय 20 वर्षे इतके आहे. परंतु, मनोरुग्ण असल्याने तो पूर्णपणे आपल्या वडिलांवर अवलंबून होता. अंघोळ घालण्यापासून तर त्याला दोन घास भरवण्यापर्यंत सगळं काही वडीलच करायचे. परंतु, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत त्याचा हा मोठा आधार हिरावून घेतला. वडील जाऊन आज वर्ष झाले. त्यानिमित्त कॉलनीत त्यांचे प्रथम पुण्यस्मरणाचे बॅनर लावले. बॅनरवरील वडिलांचा फोटो बघून मात्र त्या मनोरुग्ण मुलाची प्रचंड घालमेल होते. तो बराच वेळ बॅनरखाली उभा असतो. हे चित्र बघून येणार्‍या-जाणार्‍यांचाही अश्रूंचा बांध फुटतो.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT