नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर-शिर्डी रस्त्यावर वावी येथे भारत पेट्रोलियमच्या पंपावर ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाने फोन पे द्वारे साडेतीन हजार रुपयांऐवजी चुकून 35 हजार रुपये अदा केले. संबंधित ग्राहकाला मात्र आठवडाभरानंतर ही बाब लक्षात आली. त्यांनी पंपचालकाकडे धाव घेतल्यानंतर ग्राहकाकडून चुकून जास्त आलेले 31 हजार पाचशे रुपये पंपचालकाने धनादेशाद्वारे ग्राहकाचे पैसे परत केले.
सायाळे येथील शेतकरी राजाराम शिवाजी मोढे हे आठ दिवसांपूर्वी ट्रॅक्टर घेऊन वावी येथील श्रीनिवास जाजू यांच्या सद्गुरू ऑटोमोबाइल या भारत पेट्रोलियम पंपावर डिझेल भरण्यासाठी आले असता त्यांनी 3500 रुपयांचे डिझेल भरले. मात्र, फोन पे द्वारे चुकून 35 हजार रुपये पंपचालकाच्या खात्यात गेले होते. हे पंपचालकाच्या संध्याकाळी हिशोब करताना लक्षात आले. कामगारांकडून दररोज गेलेले डिझेल व पेट्रोल व आलेले पैसे याचा हिशोब करून 31 हजार 500 रुपये एका ग्राहकाचे जास्त आल्याचे लक्षात आले. कामगार आणि पंपचालकांमध्ये चर्चा होऊन पैसे जास्त आल्याची लक्षात आल्यावर त्यांनी दिवसभरात आलेल्या ग्राहकांची तपासणी केली. मात्र, कुठलाही सुगावा लागला नाही.
मात्र मोढे यांना आठ दिवसांनी आपल्या खात्यावर चुकून जास्त रक्कम कपात झाल्याने लक्षात आले. त्यांनी पंपचालक श्रीनिवास जाजू यांची भेट घेतली व तुमच्याकडे चुकून माझ्या फोन पे द्वारे पैसे आल्याचे सांगताच पेट्रोल पंपमालक यांनी मोढे यांना प्रामाणिकपणे धनादेशाद्वारे 31 हजार 500 रुपये परत केले. शेतकरी राजाराम मोढे यांनी पंपचालक श्रीनिवास जाजू यांच्यासह कर्मचारी आदिल शेख, रामेश्वर जाजू, संजय घोटेकर, नवनाथ नरवडे, शाहिद सय्यद यांचे आभार मानले. मोढे यांच्यासोबत त्यांचे मित्र विजय शिंदे उपस्थित होते. भारत पेट्रोलियम कंपनीच्या पंपचालक व कर्मचार्यांच्या प्रामाणिकपणाचे वावीसह परिसरात कौतुक होत आहे.