CM Devendra Fadnavis On Marker Pen Ink Controversy: मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये आज मतदान सुरू आहे. आज उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
मतदानानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, सर्वांनी मतदान करा. “मतदान हा केवळ अधिकार नाही, तर ते प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. मतदान न करणं म्हणजे लोकशाहीतील आपली जबाबदारी टाळणं,” असं ते म्हणाले. राज्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं, चांगले लोक निवडून आले तरच चांगलं शहर आणि विकास घडतो, असं आवाहनही त्यांनी केलं.
दरम्यान, मतदानावेळी शाईऐवजी वापरण्यात येणाऱ्या मार्कर पेनची शाई पुसली जाते, असा आरोप विरोधकांकडून केला जात असताना, यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “या सर्व बाबी निवडणूक आयोग ठरवतो. यापूर्वीही अनेक निवडणुकांत मार्कर पेनचा वापर झाला आहे. जर कोणाला याबाबत आक्षेप असेल, तर निवडणूक आयोगाने त्याची दखल घ्यावी,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी प्रत्यक्षात आपल्या हातावरील मार्करची शाई कॅमेऱ्यासमोर पुसून दाखवत, “पाहा, शाई पुसली जात नाही,” असे सांगितले. मात्र, “काही लोक आधीच उद्याच्या निकालानंतर दोष कुणावर टाकायचा, याची तयारी करत असल्यासारखे वाटते,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीमुळे ‘मार्करची शाई पुसली जाते’ या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे.