मुंबई

पावसाळी आजारांसाठी पालिका सज्ज

Shambhuraj Pachindre

मुंबई पुढारी वृत्तसेवा : मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असताना साथीच्या आजारांनीही डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. या आजारांना थोपवण्यासाठी पालिकेच्या कीटकनाशक व आरोग्य विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. पालिकेच्या प्रमुख हॉस्पिटलसह विशेष हॉस्पिटलमध्ये 1500 बेड राखीव ठेवण्यात आले आहेत.

जानेवारी ते जून दरम्यान मलेरियाचे 1020 रुग्ण, गॅस्ट्रो2564, काविळ 215, डेंग्यू 98 रुग्ण आढळले. नायर, सायन, केईएम, कूपर या मोठ्या हॉस्पिटलसह कस्तुरबा व 16 उपनगरीय हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा सुविधा सज्ज ठेवण्यात आली आहे. रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी विविध हॉस्पिटलमध्ये 1500 बेड राखीव ठेवण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. यात प्रमुख हॉस्पिटलपैकी नायर 150, सायन 175, केईएम 175 असे 500 बेड तयार ठेवण्यात येणार आहेत.

कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये 100 बेडचा एक स्वतंत्र विभाग तयार करण्यात येत आहेत. उर्वरित बेड उपनगरीय हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करण्यात येत आहेत. गरज पडल्यास बेडची संख्या वाढविण्यात येईल, असे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. आरोग्य विभाग पावसाळी आजारांवर नियंत्रण ठेवणार आहे. या माध्यमातून पालिका हॉस्पिटल्ससह खासगी हॉस्पिटल, नर्सिंग होम्स, डिस्पेनसरी यांच्याशी संपर्क ठेवण्यात येणार आहे.

तेथे येणार्‍या डेंग्यू, मलेरिया, कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस आदी रुग्णांचे अहवाल पालिकेला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अहवालांचा अभ्यास करून मुंबईतील 'हाय रिस्क' विभाग शोधून त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल, असेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. डेंग्यू, मलेरिया, कावीळ, गॅस्ट्रो, ताप आदी आजारांच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचा साठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.स्थानिक पातळीवर खरेदीची परवानगी देण्यात आली आहे.

मुंबईतील विविध रुग्णालयांत उपचारासाठी 1500 बेड राखीव

हेही वाचा

SCROLL FOR NEXT