मुंबई : निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घराजवळील फायरिंगप्रकरणी स्वप्निल बंडू सकट, समर्थ शिवशरण पोमाजी, सिद्धार्थ दीपक येनपुरे, आदित्य ज्ञानेश्वर गायकी आणि आसाराम श्रीरंग फासले या पाचही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना पोलीस बंदोबस्तात मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी 23 फेब्रुवारीपर्यंत वाढविली आहे. रोहित शेट्टी यांच्या घराजवळ फायरिंगनंतर दुसऱ्या दिवशी स्वप्निल सकट, समर्थ पोमाजी, सिद्धार्थ येनपुरे आणि आदित्य गायकी या चौघांना पुण्यातून खंडणीविरोधी पथकाने अटक केली होती. त्यांच्या चौकशीत आसाराम फासले याचे नाव समोर आले होते. त्यानंतर त्यालाही पुण्यातून पोलिसांनी अटक केली.
याच गुन्ह्यात पाचही आरोपींविरुद्ध पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली होती. अटकेनंतर त्यांना मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे मंगळवारी दुपारी त्यांना पुन्हा मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयासने त्यांना 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याच गुन्ह्यात सोमवारी हरियाणा आणि उत्तरप्रदेशातून मुख्य शूटरसह सातजणांना पोलिसांनी अटक केली होती. ते सर्वजण 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. या सर्व आरोपींची समोरासमोर चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. तर या गुन्ह्यातील शुभम लोणकर हा मुख्य आरोपी फरार आहे.