मुंबई

जुहू चौपाटीवर तिघे जण बुडाले

Shambhuraj Pachindre

मुंबई : पुढारी वृत्तसेवा चेंबूर येथून जुहू चौपाटीवर पोहण्यासाठी आलेल्या 4 तरुणांपैकी तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. एका तरुणाला वाचविण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे. अमन सिंह(21), कस्तुभ गणेश गुप्ता (18) आणि प्रथम गणेश गुप्ता (16) या अशी मृतांची नावे आहेत. कस्तुभ आणि प्रथम हे दोघे भाऊ होते, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाने दिली.

नौदलाकडून बुडालेल्या मुलांची शोधमोहीम सुरू होती. रात्री 8 वाजताच्या सुमारास त्याचे मृतदेह सापडले. चेंबूरची ही मुले समुद्रात जात असताना त्या ठिकाणी तैनात असलेला लाईफ गार्डच्या जवानाने त्यांना आतमध्ये जाण्यास मनाई केली होती. तरीही ही मुले समुद्रात उतरली. पोहताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. ते समुद्रात बुडताना उपस्थित जीवरक्षकांना दिसले. तातडीने जीवरक्षकांनी त्यांच्या दिशेने धाव घेवून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु समुद्राच्या लाटामध्ये त्यांना पाण्याने दूरपर्यंत ओढून नेले,अशी प्राथमिक माहिती येथील जीवरक्षकाने दिली.

सोमवारी संध्याकाळी देखील इर्ला येथील एका मुलाचा बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. सलग घडलेल्या दोन घटनांमुळे येथील जीवरक्षकांच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्‍नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT