मुंबई : पायधुनीतील एकाच कुटुंबातील चौघांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी जे. जे मार्ग पोलिसांना फॉरेन्सिक सायन्स लॅबचा अहवाल प्राप्त झाला असून, या अहवालानुसार या चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधातील विषारी घटक झिंक फॉस्फाईडमुळे झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे संबंधित फॉरेन्सिक डॉक्टरची जबानी नोंदवून पुढील तपासाची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
गेल्या महिन्यांत अब्दुल्ला डोकाडिया त्याची पत्नी नसरीन डोकाडिया, मुलगी आयेशा डोकाडिया आणि झेनब डोकाडिया यांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. हे सर्वजण इस्माईल कुर्ते रोडवर त्यांच्या एका नातेवाईकांकडे स्नेहसंमलनासाठी गेले होते. तिथे त्यांनी जेवण केले आणि जेवणानंतर कलिंगड खाल्ले होते. यानंतर प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान या चौघांचा मृत्यू झाला होता.
यामुळे त्यांच्या जेवणासह कलिंगडदेखील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल गुरुवारी पोलिसांना प्राप्त झाला. त्यानुसार चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या विषाचे सेवन केल्यामुळे झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्या शरीरात झिंक फॉस्फाईडचे अंश सापडले आहेत. मात्र, त्यांनी ते विष अजाणतेपणाने सेवन केले की त्यांना ते देण्यात आले होते हे अजून स्पष्ट झालेले नाही.