Political News Pudhari
मुंबई

Political News: राहुल गांधींच्या दिल्लीतील मोर्चासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना धमक्या; भाजपने धमकावणीचा व्हिडीओ दाखवत केले आरोप

अजय चिकारा यांनी दिल्लीतील राहुल गांधी यांच्या आंदोलनासाठी पदाधिकाऱ्यांना बोलावले; न गेल्यास निलंबन आणि निवडणूक लढवण्यास मनाईची धमकी दिल्याचा नवनाथ बन यांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: दिल्लीत सुरू असलेल्या राहुल गांधी यांच्या आंदोलनासाठी युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तातडीने दिल्लीत यावे; अन्यथा निलंबनाची कारवाई करू आणि पुन्हा कोणतीही निवडणूक लढू दिली जाणार नाही, अशा धमक्या युवक काँग्रेसचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा यांनी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असा आरोप करत भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी यासंदर्भातील व्हिडीओ जारी केला.

पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी काँग्रेस नेत्यांकडून आपल्याच पदाधिकाऱ्यांना दिलेल्या धमकीचा व्हिडीओ दाखवला.

ते म्हणाले, राहुल गांधी यांनी आंदोलन, चळवळ नक्की करावी. मात्र, त्यासाठीचे सामर्थ्य आणि कर्तृत्व त्यांच्याकडे नाही. हा रविवारचा ऑडिओ आहे. त्यात ज्या शहरात असाल तिथून तातडीने सोमवारी दिल्लीत हजर व्हा, असे आदेश महाराष्ट्रातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना प्रभारींकडून दिले जात आहेत.

हा अतिशय गंभीर प्रकार आहे. राहुल गांधी यांना रिलाँच करण्यासाठी कशा पद्धतीने हुकूमशाही केली जात आहे, याचा भांडाफोड या व्हिडीओच्या माध्यमातून झाला आहे, असे बन म्हणाले.

या देशात अराजकता निर्माण करायची आणि बांगला देश, नेपाळ व श्रीलंकेसारखी परिस्थिती व्हावी, यासाठी कदाचित राहुल गांधी यांचे हे षड्‌यंत्र असेल.

म्हणूनच महाराष्ट्रातील हे उदाहरण समोर आले आहे. कदाचित कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्येही युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अशाच धमक्या दिल्या जात असतील, असा आरोप बन यांनी केला.

राहुल गांधी यांचा सर्वोच्च न्यायालयावर, निवडणूक आयोगावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानावरही विश्वास नाही. त्यामुळे या देशातील जनतेचाही राहुल गांधी यांच्यावर विश्वास नाही, असे बन यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT