GN Saibaba TISS Student  Pudhari
मुंबई

TISS Students: 'तुमचं करिअर उद्ध्वस्त...', TISS च्या विद्यार्थ्यांना कोर्टाचा इशारा; जी. एन. साईबाबांच्या कार्यक्रमामुळे 9 विद्यार्थ्यांवर गुन्हा

TISS Students in Trouble: जी. एन. साईबाबा यांच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमात सहभागी झाल्याने TISS मधील 9 विद्यार्थ्यांवर ट्रोम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Rahul Shelke

GN Saibaba Death Anniversary: मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मधील नऊ विद्यार्थ्यांनी दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमात सहभाग घेतल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी (अँटिसिपेटरी बेल) अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला असला, तरी सत्र न्यायालयाने विद्यार्थ्यांना फटकारलं आहे.

सोमवारी या प्रकरणाची सुनावणी करताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनोज बी. ओझा यांनी विद्यार्थ्यांना थेट इशारा दिला की, “तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्याचा नोकरीवर परिणाम होईल. तुमचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं.”

“सरकारी नोकरी मिळणार नाही…”

सुनावणीदरम्यान हे नऊ विद्यार्थी कोर्टरूमच्या मागच्या बाजूला रांगेत उभे होते. न्यायाधीशांनी त्यांना विचारले, “तुमच्यातले किती जण महाराष्ट्राबाहेरचे आहेत? तुम्ही महाराष्ट्रात शिक्षणासाठी आलात, आणि हे सगळं करताय? तुमच्या वडिलांना या प्रकरणाची माहिती आहे का?”

यानंतर न्यायाधीश म्हणाले, “या केसमुळे तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार नाही. आणि खासगी क्षेत्रात नोकरी करताना देखील तुमच्यावर गुन्हा सुरू असल्याची माहिती द्यावी लागेल.”

“आता गुन्हेगारी रेकॉर्ड तयार झालंय”

न्यायाधीशांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की, “आता तुमचं गुन्हेगारी रेकॉर्ड तयार झालं आहे. ते केवळ इथल्या पोलिसांकडे नाही, तर देशभरात उपलब्ध असणार आहे. करिअर सुरू होण्याआधीच तुम्ही मोठी चूक केली आहे.”

“MSW केलंत तरी नोकरी मिळेलच असं नाही”

न्यायाधीशांनी विद्यार्थ्यांच्या वकिलांना ते कोणता अभ्यासक्रम शिकत आहेत, हेही विचारले. वकिलांनी सांगितले की हे विद्यार्थी मास्टर ऑफ सोशल वर्क (MSW) करत आहेत.

यावर न्यायाधीश म्हणाले की, “तुमच्या डिग्रीमुळे तुम्हाला नोकरी मिळेलच असे नाही. तुम्हाला वाटतंय का की तुम्ही वैज्ञानिक किंवा इंजिनिअर आहात? इंजिनिअर्सनाही नोकऱ्या मिळत नाहीत,” असा टोमणाही त्यांनी मारला.

काय आहे प्रकरण?

हा गुन्हा 12 ऑक्टोबर 2025 रोजी TISS च्या देवनार (Deonar) कॅम्पसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमाशी संबंधित आहे. हा कार्यक्रम जी. एन. साईबाबा यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता.

जी. एन. साईबाबा यांना यापूर्वी UAPA (Unlawful Activities Prevention Act) अंतर्गत अटक झाली होती. मात्र 5 मार्च 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. तसेच 2017 मध्ये सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली होती.

अटकपूर्व जामिनावर सुनावणी पुढे ढकलली

या नऊ विद्यार्थ्यांवर ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल आहे. विद्यार्थ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून प्रकरणाची सुनावणी अजून सुरू आहे. न्यायाधीशांनी विद्यार्थ्यांना समज दिल्यानंतर त्यांना कोर्टरूमच्या बाहेर जाण्यास सांगितले आणि सुनावणीची तारीख वकिलांना सांगितली. या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन आणि लॅपटॉपसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT