मुंबई : वरळी एक-दक्षिण विभागात महापालिकेचे स्वतंत्र हॉस्पिटल नसल्यामुळे शासनाच्या वरळी येथील पोदार आयुर्वेद इंस्टिट्यूटमध्ये (पोदार हॉस्पिटल) आयसीयू कक्ष उभारण्यात येत आहे. यासाठी पालिकेकडून 30 आयसीयू बेड देण्यात येणार आहेत. यासाठीच्या अन्य सेवा सुविधाही पालिकेतर्फे उभारण्यात येणार आहेत.
या सेवेचा वरळी, लोअर परेल व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना लाभ होणार आहे. कोविड कालावधीमध्ये मुंबई महानगरपालिकेने येथे विलगीकरण कक्ष उभारला होता. तसेच येथे 30 खाटांचे आयसीयू युनिट उभारण्याचे प्रस्तावीत केले होते. त्यानुसार आयसीयू कक्ष उभारण्यात येत असून याचे कामही सुरू आहे. यात वायरिंग कामे, सीसीटीव्ही लावणे नेटवर्कीग व टेलिफोन सुविधा, पब्लिक ऍड्रस सिस्टिम पुरवण्यात येणार आहे.
अखंडीत विद्युत पुरवठ्यासाठी डिझेल जनरेटर भाडेतत्वावर पुरवण्यात येणार आहे. त्याशिवाय आयसीयु कक्षासाठी वातानुकुलन यंत्रणा, मेडिकल गॅस पाईपलाईन सिस्टीम, ऑक्सीजन, व्हॅक्युम व वैद्यकीय गॅस पुरवण्यासाठी कॉपर पाईपलाईन टाकणे, जम्बो सिलींडरकरिता मॅनिफोल्ड बसविणे, वैद्यकीय उपकरणे बसवली जाणार आहेत. यासाठी 8 कोटी 88 लाख रुपये इतके खर्च केले जाणार आहे.