मुंबई : देशाच्या गृहविक्री बाजारपेठेतील सर्वाधिक किमतींचे व्यवहार मुंबईच्या वरळी परिसरात होऊ लागले आहेत. गेल्या दोन वर्षांत 40 कोटींपेक्षा अधिक किंमत असलेल्या 30हून अधिक मालमत्तांची विक्री वरळी येथे झाली. या मालमत्तांचे एकूण विक्री मूल्य 5 हजार 500 कोटी आहे.
गेल्या तीन वर्षांत वरळीत प्रत्येकी 100 कोटींहून अधिक किंमत असलेल्या 20 घरांची विक्री झाली. ॲनारॉकच्या अहवालानुसार 2025 या वर्षांत विक्री झालेल्या दोन दुमजली घरांची किंमत 700 कोटींपेक्षा अधिक होती. गेल्या दोन वर्षांत देशात विक्री झालेल्या 40 कोटींपेक्षा अधिक किमतीच्या घरांमध्ये वरळीतील घरांचा वाटा 40 टक्के आहे. सर्वाधिक महागड्या घराची किंमत 65 हजार ते 1 लाख रुपये प्रतिचौरस फूट इतकी आहे. याची तुलना न्यू यॉर्कच्या लोअर मॅनहॅटन शहराशी केली जाऊ शकते.
सध्या वरळीत सुरू असलेली आणि पूर्ण झालेली बांधकामे यांचे एकूण विक्री मूल्य 69 हजार कोटींपेक्षाही अधिक आहे. वरळीत कार्यालयीन वापरासाठी 8.1 टक्के जागा उपलब्ध असून याचा भाडेदर 180 ते 375 रुपये प्रतिचौरस फूट आहे. सध्या वरळीत 40 एकर जागेवर 36 हजार कोटी विक्री मूल्याची बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे देशभरातील आर्थिक सुबत्ता वरळीत केंद्रित झालेली दिसते.