प्रकाश साबळे
मुंबई : सिडको आणि म्हाडाप्रमाणे मुंबई महापालिकेनेही विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार प्राप्त झालेल्या 426 सदनिकांची अल्प व अत्यल्प गटासाठी सोडत जाहीर केली आहे. मात्र, मुंबईतील ही घरे म्हाडाच्या घरांपेक्षाही महाग आहेत. भायखळ्यातील 270 चौरस फुटांच्या घराची विक्री किंमत तब्बल 1 कोटी 7 लाख तर कांजुरमार्गच्या 450 चौ.फु. घराची विक्री किंमत 98 लाख ते 1 कोटी आहे.
महापालिकेला 15 टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 186 घरे, तर विकास नियंत्रण नियमावली 2034 च्या 33 (20) (ब) अंतर्गत 240 घरे विक्रीसाठी मिळाली आहेत. या लॉटरीसाठी 16 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याची शेवटची तारिख आहे. 20 नोव्हेंबर रोजी सदनिकांची सोडत निघणार आहे. या सोडतीत 59 टक्के घरे सर्वसाधारण गटासाठी राखीव असतील. पालिकेतील कर्मचार्यांसाठीही काही घरे राखीव आहेत. सामाजिक आरक्षणासह पत्रकार, कलाकार आणि इतर आरक्षणही या सोडतीत आहे. राज्य सरकार कर्मचारी, केंद्र सरकारी कर्मचारीही ही घरे घेऊ शकतील.
त्या त्या भागातील शीघ्रगणक दर आणि त्यावर 10 टक्के प्रशासकीय खर्च याप्रमाणे घरांच्या किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत. भायखळ्यातील शीघ्रगणक दर 30 हजार रुपये चौ. फुटांपर्यंत आहेत. त्यामुळे भायखळ्यातील 42 घरांच्या किंमती एक कोटीच्या वर पोहोचल्या. या घरांसाठी अर्जदारांना वार्षिक कौटुंबीक उत्पन्न मर्यादा सहा लाखांपर्यंत असल्याने विजेत्या लाभार्थ्यांना एवढे कर्ज कसे मिळेल, असा प्रश्न आहे.