Fraud Pudhari
मुंबई

London Gift Scam: मॅट्रिमोनियल साइटवर महिला पोलीस शिपायाशी मैत्री; लंडनहून गिफ्टचे आमिष अन् ११.१९ लाखांची फसवणूक

‘रवीकुमार’ नावाच्या भामट्याचा कारनामा; वेगवेगळ्या कारणांनी पैसे उकळल्याचा आरोप, सायबर सेलचा तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावरुन माहिती मिळवून महिला पोलीस शिपायाशी मैत्री केली. त्यानंतर लंडनहून महागडे गिफ्ट पाठविण्याचे आमिष दाखवत वेगवेगळ्या कारणांनी तब्बल ११ लाख १९ हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी फसवणुकीसह माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, ‘रवीकुमार’ नाव सांगणाऱ्या भामट्यासह लाभार्थी खातेदाराचा शोध सुरू केला आहे.

तक्रारदार महिला पोलीस शिपाई असून सध्या वांद्रे पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. कौटुंबिक वादामुळे पतीपासून विभक्त राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर ती मुलासह सांताक्रुझ पोलीस वसाहतीत राहत होती. लग्नासाठी मॅट्रिमोनियल संकेतस्थळावर तिने आपली माहिती दिली होती.

दरम्यान, तिला रवीकुमार नावाच्या व्यक्तीचा फोन आला. आपण लंडनमध्ये राहत असून व्यावसायिक असल्याचे त्याने सांगितले. गुजरातमध्ये दोन, तर लंडनमध्ये दोन फ्लॅट असल्याचे व आयफोन आणि दुचाकी बनविणाऱ्या दोन खासगी कंपन्या असल्याचे सांगून त्याने तिचा विश्वास संपादन केला.

काही दिवसांनी त्याने लंडनमध्ये एका नामांकित वाहन कंपनीकडून पुरस्कार मिळाल्याचे सांगत आलिशान कारसोबतचा फोटो तिला पाठविला. याचवेळी लंडनहून काही महागडी गिफ्ट पाठविणार असल्याचे त्याने सांगितले.

फसवणूक झाल्यावर पोलिसांकडे तक्रार

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर हेल्पलाईन तसेच पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांकडे तक्रार केली.

महागड्या गिफ्टसाठी पैसे ट्रान्सफर

४ सप्टेंबरला एका अज्ञात व्यक्तीने तक्रारदार महिलेला फोन केला. आपण एअरपोर्ट प्राधिकरणातून बोलत असून लंडनहून तिच्यासाठी महागडे गिफ्ट आले असल्याचे सांगितले. या गिफ्टमध्ये विदेशी चलन आणि सोन्याचे दागिने असल्याचे सांगत तिच्याकडून पैसे मागण्यात आले.

गिफ्ट मिळणार असल्याच्या विश्वासाने महिलेने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ११ लाख १९ हजार रुपये ट्रान्सफर केले. पैसे भरूनही गिफ्ट मिळाले नाही. उलट संबंधितांकडून तिच्या आधारकार्डची मागणी करण्यात आली. याप्रकरणीतिने रवीकुमारशी संपर्क साधल्यावर त्याने पुन्हा पैसे पाठविण्यास सांगितले. पैसे न दिल्यास तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT