कुर्ला: समाजमाध्यमांवर महिलेचे अश्लील फोटो प्रसारित करण्याची धमकी देत विक्रोळी येथील महिलेला एका भामट्याने तब्बल ९० हजार रुपयांचा गंडा घातला आहे. याबाबत महिलेने विक्रोळी पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
स्मार्ट फोन हातात आल्यापासून सर्वचजण समाजमाध्यमांवरच अधिक वेळ घालवत असतात. मात्र काही वेळा समाजमाध्यमही किती घातक ठरू शकते याचेच उदाहरण विक्रोळीमध्ये समोर आले आहे.
विक्रोळी परिसरात राहणारी ४२ वर्षीय महिला काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे फेसबुकवर वेळ घालवत होती. यावेळी तिला एका अभिनेत्याचे खाते येथे दिसून आले. तिने त्याला मैत्रीसाठी फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवली.काही दिवसांत त्याने मैत्री मान्य केली. मात्र हे खाते अभिनेत्याच्या नावाचे बनावट खाते होते.
काही दिवस दोघेही एकमेकांशी बोलत होते. त्यानंतर दोघांनी एकमेकांना त्यांचा मोबाईल नंबर पाठवला. त्यानंतर अनेक दिवस दोघेही एकमेकांसोबत मेसेजवर बोलत होते. महिलेसोबत चांगली मैत्री होताच आरोपीने तिला तिचे काही अश्लील फोटो व व्हिडीओ पाठवायला सांगितले.
महिलेनेही त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला फोटो आणि व्हिडिओ पाठवले. मात्र त्यानंतर तिने पाठवलेले फोटो व व्हिडीओ तिला दुसऱ्या एका अनोळखी नंबरवरून तिच्या मोबाईलवर आले.महिलेने संबंधित नंबरवर फोन केला असता, आरोपीने फोटो व व्हिडीओ डिलीट करण्यासाठी ३० हजार रुपये महिलेकडे मागितले.
महिलेने भीतीपोटी त्याला पैसे दिले. मात्र त्यानंतर अन्य दोन नंबरवरून महिलेकडे पुन्हा पैसे मागण्यात आले. आशा प्रकारे आरोपींनी महिलेकडून ९० हजार रुपये उकळले. त्यानंतर तिच्याकडे ३ लाखांची मागणी करण्यात आली. महिलेने अखेर ही बाब पतीला सांगितली. त्यांनी याबाबत सायबर पोलिसांकडे धाव घेतली.