Fish Price Hike pudhari photo
मुंबई

Mumbai Fish Price Hike : थंडीचा कडाका वाढताच माशांच्या दरात मोठी वाढ

मुंबईसह नवी मुंबई बाजारात आवक घटली : खवय्यांना मोजावे लागत आहेत अधिक पैसे

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच थंडीचा जोर वाढू लागल्याने त्याचा परिणाम आता मासळी बाजारावरही दिसून येत आहे. थंडीमुळे समुद्रातील मासेमारीवर परिणाम होत असून बाजारात माशांची आवक घटली आहे. परिणामी, मुंबईसह नवी मुंबईतील मासळी बाजारात विविध प्रकारच्या माशांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे खवय्यांना आता अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

सध्या बाजारात सुरमई, पपलेट, घोळ, जिताडा यांसारख्या लोकप्रिय माशांचे दर चांगलेच वाढले आहेत. विशेषतः मोठ्या आकाराच्या आणि चांगल्या प्रतीच्या माशांना अधिक मागणी असल्याने त्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे चित्र आहे. कोळंबीच्या दरातही वाढ झाली असून सर्वसामान्य ग्राहकांना मासळी खरेदी करताना आपल्या खिशाचा विचार करावा लागत आहे.

मासळीच्या वाढत्या दरांमुळे ग्राहकांतून नाराजी व्यक्त होत असून आवक कमी झाल्याने विक्रेत्यांनाही वाढीव दराने मासळी विकावी लागत असल्याचे चित्र आहे. आगामी काळात थंडीचा जोर आणि समुद्रातील मासेमारीची परिस्थिती पाहता मासळीचे दर कशाप्रकारे बदलतात, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

किनारपट्टीवरील अनेक कुटुंबांच्या रोजच्या जेवणाचा मासळी हा अविभाज्य भाग आहेत. मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या मासळीच्या किमतींमुळे सर्वसामान्यांना मासे खरेदी करणे कठीण होत आहे. मासेमारी कमी झाली की दर वाढतात, हे मान्य असले तरी ग्राहकांच्या खिशालाही परवडणारे दर असणे गरजेचे आहे. मासळीचे दर असेच वाढत राहिले, तर मासळी केवळ सणासुदीलाच खरेदी करण्याची वेळ येईल, अशी प्रतिक्रिया सुशीला दत्तात्रेय कोळी यांनी व्यक्त केली.

सध्या बाजारात असलेले मासळीचे दर (प्रतिकिलो)

  • सुरमई - १,७०० रुपये किलो

  • पापलेट - १,२००

  • काफरी पॉपलेट - १,६०० ते १,८००

  • कोळंबी - ७०० ते ८००

  • घोळ - १,५००

  • जिताडा - १,४०० ते १,५००

  • हलवा - १,१००

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT