Omraje Nimbalkar on Operation Tiger Pudhari
मुंबई

Omraje Nimbalkar: शिंदे गटात की ठाकरेंच्या बाजूने? वर्धापन दिनाला हजर राहणार का? ओमराजे निंबाळकरांनी सोडलं मौन

Omraje Nimbalkar on Operation Tiger: शिवसेना ठाकरे गटातील कथित बंडखोरीच्या चर्चांदरम्यान धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी 20 जूननंतरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Omraje Nimbalkar on Operation Tiger: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील बंडखोरीच्या चर्चांनी राज्याचे राजकारण तापले असतानाच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी याबाबत सावध भूमिका घेतली आहे. पक्षातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू असताना ओमराजे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदार स्वतंत्र गट स्थापन करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सध्या जोर आला आहे. या संभाव्य घडामोडींमध्ये ओमराजे निंबाळकर यांचे नावही चर्चेत आहे. मात्र त्यांनी अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही.

‘पुढारी न्यूज’शी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. "मला जे बोलायचे आहे ते 20 जून रोजी निकाल लागल्यानंतर बोलेन. तोपर्यंत मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आज होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार का, असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या प्रश्नावर त्यांनी मौन बाळगल्याने त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबतचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगली असून ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात जाणार असल्याचा दावा केला जात आहे. अशा परिस्थितीत ओमराजे निंबाळकर यांची भूमिका नेमकी काय असेल, याकडे शिवसैनिकांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

20 जून रोजी येणाऱ्या महत्त्वाच्या निकालानंतरच आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने, त्यांचा पुढील निर्णय राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT