महिलांबाबत ठाकरे गटाने आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी शायना एन.सी यांनी केली आहे. file photo
मुंबई

अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर 'मविआ'तील महिला नेत्यांची तोंड बंद का? : शायना एन.सी

Shaina NC vs Arvind Sawant | महिलांबाबत ठाकरे गटाने भूमिका जाहीर करावी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी सावंत यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. महिलांच्या अवमानाबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांची तोंड का बंद आहेत, असा सवाल शिवसेनेच्या मुंबादेवी मतदार संघातील उमेदवार शायना एन.सी यांनी आज (दि.२) केला. महिलांबाबत ठाकरे गटाने आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, इम्पोर्टेड माल या टिप्पणीवरुन अरविंद सावंत यांनी माफी मागितली. पण संजय राऊत म्हणाले ही माफी नाही. त्यामुळे ठाकरे गटाला महिलांबाबत काही मान सन्मान आहे की नाही, हे आता त्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी शायना एन.सी यांनी केली. काल नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्यावर आज राऊत समर्थन करत असतील. तर त्यांच्या मनस्थितीवर संशय येतो, असा टोला त्यांनी लगावला. घडलेल्या प्रकारावर महाविकास आघाडीतील महिला नेत्यांची तोंड बंद का? ही पुरुषप्रधान मानसिकता कधी संपणार? असा सवालही त्यांनी केला. संजय राऊत यांना माफी मागायची असेल, तर मुंबादेवीची माफी मागावी.

मागील वीस वर्ष आपण राजकारणात आहे.२०१४ आणि २०१९ मध्ये अरविंद सावंत यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला बोलावले होते. तेव्हा त्यांच्यासाठी मी लाडकी बहिण होती. आता इम्पोर्टेड माल बनले का ?, असा संताप त्यांनी व्यक्त केला. मी मुंबईत इम्पोर्टेड नाही. मुंबईत माझा जन्म झाला असून हीच माझी कर्मभूमी आहे. मुंबादेवी माझे माहेर आहे. मी स्वाभिमानी महिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला निवडणुकीत उमेदवारी दिली, असे त्या म्हणाल्या. कलानगरमध्ये राहणारे वरळीमधून निवडणूक लढले. त्यामुळे इम्पोर्टेड कोण आहेत असा टोला शायना एन.सी यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.

मविआचे उमदेवार अमिन पटेल यांनी मतदार संघात कोणतेही विकासाचे काम केले नाही. इथल्या धोकादायक चाळींचा पुनर्विकास, कामाठीपुराचा पुनर्विकास यासाठी प्रयत्न केले नाहीत, अशी टीका त्यांनी केली. सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी महिला आहे, लढू शकते, असे नेहमी म्हणतात. मला विरोधकांनाही सांगायचे आहे की माझ्यावर मुंबादेवीचा आशीर्वाद असून मी निवडणूक लढणार आणि जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT