मुंबई : शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांचा 'इम्पोर्टेड माल' असा उल्लेख केल्यानंतर शिवसेना उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शायना एनसी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. एफआयआर नोंदवण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीचा उल्लेख महाविनाश आघाडी करत शायना एनसी यांनी जोरदार हल्लाबोल केला.
अरविंद सावंत यांनी 'माल' म्हणून संबोधल्याचा आरोप शायना एनसी यांनी केला आहे. तसा व्हिडीओ त्यांनी दाखवून सावंत यांनी महिलांचा अपमान केला असून त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. सावंत यांच्या अवमानजनक वक्तव्यामुळे राज्यातील नारीशक्ती येत्या निवडणुकीत शिवसेना उबाठाला धडा शिकवेल, असे शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सांगितले. यावेळी सावंत यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी करणारे निवेदन महिला आघाडीकडून पोलिसांना देण्यात आले. त्यांच्या अटकेसाठी महिला आघाडीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना राबवत आहेत. महिलांचा मान सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे, मात्र अरविंद सावंत यांनी अश्लाघ्य शब्दांत महिलांचा अपमान केला. ही त्यांची संस्कृती आहे का, असा सवाल शायना एन. सी. यांनी केला.
शायना एनसी यांनी २८ ऑक्टोबर रोजी भाजप सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे यांनी त्यांना मुंबादेवीतून उमेदवारी दिली आहे. मुंबादेवी जागेवर काँग्रेसचे उमेदवार अमीन पटेल यांच्या विरोधात शायना एनसी निवडणूक लढवत आहेत.
माझ्याकडून महिलांचा अवमान कधीच होणार नाही. जे मी विधान केले आहे, त्यामध्ये त्यांचे नाव कुठे आहे हे त्यांनी सांगावे. दुसरे म्हणजे ते विधान मी हिंदीत केले होते. त्यात मी माझ्या उमेदवारालाही माल म्हटले होते. ते कसे काय गाळून सांगता, असे स्पष्टीकरण अरविंद सावंत यांनी दिले आहे.
उबाठाच्या एका खासदारांनी शिवसेनेच्या उमेदवार शायना एन. सी. यांच्यासंदर्भात केलेले विधान हे समस्त स्त्री जातीचा अपमान करणारे आणि उबाठाची वैचारिक पातळी दाखवणारे आहे. एका स्त्रीचा उल्लेख 'माल' असा करून अरविंद सावंत यांनी महाराष्ट्रातील महिलांच्या पराक्रमी परंपरेला आणि पुरोगामी विचार- सरणीला शरमेने मान खाली घालायला लावली आहे. राजधर्म शिकवणाऱ्या माता जिजाईपासून, तर समाजसुधारणेचा वसा घेतलेल्या सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंतची थोर परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. स्त्रीत्वाचा सन्मान आणि महिलांना सक्षम करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे हा मराठी माणसाचा डीएनए आहे. आमच्यासाठी प्रत्येक महिला ही लाडकी बहीण असून तिची उन्नती, तिचा विकास, तिची प्रतिष्ठा आणि तिचा स्वाभिमान हाच आमचा ध्यास आहे. राजकारणापायी एखाद्या व्यक्तीने एवढी खालची पातळी गाठावी हे दुर्दैवी आहे.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री