CJP Mumbai Protest: मुंबईतील शिवाजी पार्क येथे आज कॉकरोच जनता पार्टी (CJP) कडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ‘जेल भरो आंदोलन’ सुरू करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांबाबत समोर आलेल्या वृत्तानंतर CJP ने हे आंदोलन सुरु केले आहे. मात्र, आंदोलनासाठी मुंबईची निवड करण्यामागे केवळ हाच मुद्दा नसल्याचे CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईत गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अभिजीत दिपके यांनी महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या निकालांचा संदर्भ देत आंदोलनाची सुरुवात मुंबईतून करण्याचे कारण सांगितले.
“2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रातील 48 पैकी केवळ 9 जागा मिळाल्या. मात्र, त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत चित्र पूर्णपणे बदलले. हा बदल कसा झाला?” असा सवाल दिपके यांनी उपस्थित केला. याच पार्श्वभूमीवर मुंबईतून आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी, “दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा,” असे म्हटले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांपैकी भाजपने 28 जागांवर निवडणूक लढवली आणि त्यापैकी 9 जागा जिंकल्या. शिवसेनेला 7 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली. त्यामुळे महायुतीच्या खात्यात एकूण 17 जागा जमा झाल्या.
दुसरीकडे, महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या. काँग्रेसला 13, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 9 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 8 जागा मिळाल्या. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला.
लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजप 132 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला.
भाजपसोबत असलेल्या शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. त्यामुळे महायुतीने 288 पैकी तब्बल 230 जागा जिंकल्या. याउलट महाविकास आघाडीला 46 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला 16, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 20 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा मिळाल्या.
विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी ‘व्होट चोरी’चा आरोप करत निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेचा मुद्दा मांडला होता.
विदर्भातील काही विधानसभा मतदारसंघांचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेतील गैरव्यवस्थापनाकडे लक्ष वेधले होते. CJPच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिपके यांनीही महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निकालांमधील फरकाचा उल्लेख केला आहे.
CJPने 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी यांच्या जयंतीचा दिवस आंदोलनासाठी निवडला आहे. शिवाजी पार्क येथे आंदोलनासाठी पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्याचे दिपके यांनी सांगितले.
मात्र, परवानगी नाकारली असली तरी आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका त्यांनी मांडली. “आम्ही सत्तेतील लोकांविरोधात लढत आहोत. महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरोधात आंदोलन केले. ब्रिटिशांनी त्यांना आंदोलन करण्याची परवानगी दिली होती का?” असा सवाल दिपके यांनी केला.
ज्येष्ठ पत्रकार आणि कार्यकर्ते जितिन देसाई यांनीही मुंबईचा महात्मा गांधींच्या आंदोलनाशी असलेला ऐतिहासिक संबंध अधोरेखित केला. 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील तत्कालीन ग्वालिया टँक मैदानावरून महात्मा गांधींनी ‘भारत छोडो’ आंदोलनाची हाक दिली होती. हेच ठिकाण आता ऑगस्ट क्रांती मैदान म्हणून ओळखले जाते.
CJPचे हे आंदोलन मुंबईपुरते मर्यादित नाही. देशातील इतर प्रमुख शहरांमध्येही आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. कोलकाता, गोवा, बंगळुरू आणि रांची या शहरांचाही त्यात समावेश आहे. मुंबईतून सुरू होणाऱ्या या आंदोलनातून निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आणि निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेवर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न CJPकडून केला जात आहे.