Raj & Uddhav Thackeray Rallies: राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना बहुतेक पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. ठिकठिकाणी जाहीर सभा, रॅली, आरोप-प्रत्यारोप सुरू असताना मात्र एक गोष्ट अनेकांच्या लक्षात येत आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे प्रचारात फारसे दिसत नाहीत. त्यांच्या जाहीर सभा नसल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून राजकीय वर्तुळातही याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना थेट प्रश्न विचारण्यात आला. राज आणि उद्धव ठाकरे सभा का घेत नाहीत, असा प्रश्न माध्यमांनी विचारल्या नंतर राऊत यांनी थेट आणि स्पष्ट उत्तर दिलं.
संजय राऊत म्हणाले की, सभा कधी घ्यायच्या आणि कशा घ्यायच्या याचं नियोजन आधीच करण्यात आलं आहे. “आमच्या सभा दिसत नाहीत म्हणून चर्चा करण्याचं कारण नाही. सभा म्हणजे केवळ गर्दी नाही, तर योग्य वेळ आणि योग्य ठिकाण महत्वाचं असतं,” असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी सांगितलं की, 9 तारखेला नाशिकमध्ये पहिली जाहीर सभा होणार असून त्यानंतर उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहेत. प्रचाराची दिशा आणि वेळापत्रक आमच्याकडे आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मुंबईतील सभांबाबत बोलताना राऊत यांनी वेगळाच मुद्दा मांडला. ते म्हणाले की, मुंबईत सभा घेण्यासाठी मैदान उपलब्ध करून दिलं जात नाही. मनसे आणि शिवसेनेला सभा घेता येऊ नयेत, या हेतूने मुद्दाम अडथळे आणले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे उगाच जाहीर सभा घेण्यापेक्षा थेट शाखांपर्यंत आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचं धोरण स्वीकारलं आहे, असं राऊत म्हणाले. मुंबईत अनेक छोट्या सभा करण्याऐवजी एकच अतिविराट सभा घेण्यावर दोन्ही पक्षांचं एकमत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचीही माहिती राऊत यांनी दिली. मुंबईतील एका हॉटेलमध्ये दोघांची संयुक्त मुलाखत होणार असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. या मुलाखतीत राजकीय प्रश्नांपेक्षा मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासावर चर्चा होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
ही मुलाखत एका मुंबईकराच्या भूमिकेतून घेतली जाणार असून, मुंबईकरांच्या अपेक्षा आणि प्रश्न केंद्रस्थानी असतील, असंही राऊत यांनी नमूद केलं. एकूणच, राज आणि उद्धव ठाकरे प्रचारात कमी दिसत असले तरी त्यांच्या रणनीतीनुसार प्रचार सुरू असून योग्य वेळेला ते मैदानात उतरणार, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.