मुंबई: अमेरिका आणि इराण युद्धामुळे कच्च्या तेलाचा उडालेला भडका, पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅसच्या देशांतर्गत किमतीत झालेली वाढ यामुळे मे महिन्यात घाऊक महागाई ९.६८ टक्क्यांवर गेली आहे.
एप्रिल महिन्यात घाऊक महागाईने ४२ महिन्यांचा उच्चांक गाठत ८.२६ टक्क्यांवर झेप घेतली होती. एप्रिल महिन्यातील निर्देशांक जुन्या आधारभूत वर्षानुसार काढण्यात आला होता. मे महिन्यात खाद्यान्नाचा घाऊक महागाई निर्देशांक ४.३९ टक्के राहिला, तर ऊर्जा निर्देशांक ३०.३३ टक्के होता.
इंधन आणि ऊर्जा निर्देशांक २४.८९ टक्क्यांवर गेला असून, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या महागाई निर्देशांकाने ६१.५१ टक्क्यांवर उसळी घेतली आहे. मे महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत चार वेळा वाढ करण्यात आली. डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर गेला. त्याचा परिणाम महागाई निर्देशांकावर दिसून आला.
एल निनोचे सावट
एल निनोमुळे जागतिक अन्नपुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा धोका आहे. त्यामुळे खाद्यान्नाचा तुटवडा जाणवून भाववाढ होईल. कच्च्या तेलाच्या राखीव साठ्यात घट झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड अस्थिर आहेत.
या सर्व धोक्यांमुळे आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये महागाई निर्देशांक सप्टेंबरनंतर सहा टक्क्यांवर जाण्याचा धोका असल्याचे प्रभुदास लीलाधर या बाजार विश्लेषक संस्थेने म्हटले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनुसार (आरबीआय) महागाई निर्देशांकाची सहनीय पातळी दोन ते सहा टक्के आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत महत्तम पातळी ओलांडली जाईल. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा १० टक्के कमी पर्जन्यमान होईल. त्यात जून महिन्यात सरासरीच्या ९२ टक्के पाऊस पडेल. पुन्हा ऑगस्ट महिन्यातही कमीच पाऊस होण्याची शक्यता आहे.