रविंद्र चव्हाण (Pudhari Photo)
मुंबई

Who is Ravindra Chavan | डोंबिवलीचे नगरसेवक ते भाजप प्रदेशाध्यक्ष, जाणून घ्या रविंद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या चव्हाण यांची आगामी महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये कसोटी लागलेली पाहायला मिळणार आहे

पुढारी वृत्तसेवा

दिलीप शिंदे, ठाणे

Who is Ravindra Chavan

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण यांच्या रूपाने पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्याला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यामुळे ठाण्याप्रमाणे डोंबिवलीलादेखील राष्ट्रीय राजकारणात विशेष महत्व आले आहे. भारतीय जनता युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष ते नगरसेवक, आमदार, संपादक, मंत्री, पालकमंत्री, भाजपचे सरचिटणीस, कार्याध्यक्ष ते आता प्रदेशाध्यक्ष असा चव्हाण यांचा राजकीय प्रवास हा सगळ्यांना थक्क करणारा आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेतील ऐतिहासिक उठाव, त्यांच्या तत्कालीन मंत्री, ४० आमदारांचा सुरत व्हाया गुवाहाटी असा झालेला प्रवास आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून घेतलेली शपथ या सर्व घडामोडीमध्यें नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रमुख भूमिका होती. त्यांच्या संघटन कौशल्यामुळेच ठाणे जिल्ह्यासह कोकणात शिवसेनेला मागे टाकून भाजपला सक्षम बनवले.

रविंद्र चव्हाण कुटुंबीय मुळचे कुठचे आहेत?

रविंद्र चव्हाण यांचे वडील दत्तात्रय चव्हाण हे नोकरी निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील पेंडूर गावातून भांडुपला राहायला आले. मुंबईचे उपनगर असलेल्या आणि कोकणी माणसांनी गजबजलेल्या भांडुपमध्ये 20 सप्टेंबर 1970 मध्ये रविंद्र यांचा जन्म झाला. संपूर्ण बालपण आणि शालेय शिक्षण हे मुंबईत झाले. बारावीपर्यंत नियमित शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथून पुढील शिक्षण घेतले. त्यांच्यावर महाविद्यालयीन जीवनापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विचारसरणीचा प्रभाव होता. चव्हाण यांच्या वडिलांनी भांडुप सोडून डोंबिवलीला राहण्याचा निर्णय घेतला आणि तोच निर्णय रविंद्र चव्हाण यांच्या राजकीय जीवनाला कलाटणी देणारा ठरला. त्यांनी डोंबिवलीत युवा मोर्चाचे काम सुरू करीत राजकारणाचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. भारतीय युवा मोर्चाचे काम करताना रविंद्र चव्हाण यांनी २००२ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि त्यांच्या सक्रिय राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.

डोंबिवलीचे नगरसेवक ते आमदारकीचा चौकार

२००५ मध्ये झालेल्या कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत चव्हाण सेनेसह भाजपच्या प्रस्थापितांना मागे टाकून डोंबिवलीच्या सावरकर रोड प्रभागातून नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर २००७ मध्ये स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. अध्यक्षपदाच्या काळात केलेल्या कामामुळे त्यांनी पक्ष अधिक मजबूत केला आणि डोंबिवली या नवीन विधानसभा मतदार संघात मनसेच्या उमेदवाराचा ६१ हजार १०४ मतांच्या फरकाने पराभव करीत सांस्कृतिक उपराजधानी समजल्या जाणाऱ्या सुशिक्षित डोंबिवलीकरांचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली. त्यांनी भाजपच्या कल्याण जिल्हा अध्यक्षपदाची यशस्वीरित्या धुरा सांभाळली. जशी जशी त्यांची राजकीय वाटचाल वेगाने वाढू लागली तसे त्यांचे अंतर्गत विरोधक ही वाढू लागले. त्यांच्या विरोधात झालेल्या स्वकीयांच्या बंडासह विरोधकांना न जुमानता चव्हाण हे २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये सलग चार वेळा आमदार बनले आहेत. सांस्कृतिक राजधानी असलेल्या डोंबिवलीकरांची बौद्धिक भूक शमविण्यासाठी डोंबिवलीकर मासिक सुरू केले. त्याचे संपादकपद ते सांभाळत आहेत.

रविंद्र चव्हाण यांचा 2013 मधील फोटो. चव्हाणांसोबत तेव्हा शिवसेनेत असलेले आणि सध्या राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे आणि तेव्हा राष्ट्रवादीत आणि सध्या भाजप नेते गणेश नाईक.

ठाणे जिल्ह्यात सलग दोन निवडणुकीत ९ आमदार निवडून आणण्याची किमया

लोकांशी जोडलेल्या या आमदाराला २०१६ मध्ये राज्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात पहिल्यांदा संधी दिली. २०१८ मध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदासह पालघरचे पालकमंत्रिपद देण्यात आले. २०१९ च्या निवडणुकीत कोकण प्रदेशात सर्वाधिक मते घेऊन विजय मिळवून त्यांनी भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आणले. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटल्या जात असलेल्या ठाणे जिल्ह्यात सलग दोन निवडणुकीत सर्वाधिक ९ आमदार निवडून आणण्याची किमया त्यांनी साधली. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात चव्हाण यांनी पक्षाचे सरचिटणीस म्हणून संघटना बांधणीचे काम केले. त्यामुळे रायगड जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे कमळ फुलवले. मित्रपक्ष शिवसेनेची मक्तेदारी मोडीत काढत चव्हाण यांनी आपल्या संघटन कौशल्याची चुणूक दाखविली.

भाजपची ताकद वाढविली

महाविकास आघाडी सरकारला सुरूंग लावण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रविंद्र चव्हाण यांची मोलाची साथ होती. शिंदे यांचे बंड यशस्वी करण्यामध्ये रविंद्र चव्हाण यांची रणनीतीदेखील पोषक ठरली. त्यांना एकनाथ शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळाली, ते सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले. त्याचबरोबर पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही सोपविण्यात आले. पालकमंत्री पदाचा योग्य वापर करीत सामान्य जनतेच्या सेवेबरोबर भाजपची ताकदही वाढविली आणि आज कोकणात भाजपचा बोलबाला आहे.

महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत लागणार कसोटी

२०२४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये चव्हाण यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यात आले नाही. त्यांच्याजागी ज्येष्ठ मंत्री गणेश नाईक यांना संधी देण्यात आल्याने चव्हाण यांच्यावर पक्ष बांधणीसाठी भाजपचे प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक निवडणुका झाल्यावर चव्हाण यांच्याकडे प्रदेश अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. चव्हाण यांच्या रूपाने डोंबिवलीच नव्हे तर ठाणे जिल्हा, कोकणाला पहिल्यादाच पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. गेल्या तीन वर्षांमध्ये ठाणे जिल्हा हा राजकीय घडामोडीचा केंद्र बनला. पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुखपद लाभले. या आता चव्हाण यांच्या रूपाने दुसरा मराठा आमदार हा राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपचे नेतृत्व करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या चव्हाण यांची आगामी राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये कसोटी लागलेली पाहायला मिळणार आहे.

रविंद्र चव्हाण यांच्याकडे किती आहे संपत्ती? (Ravindra chavan net worth)

२०२४ मधील विधानसभा निवडणुकीदरम्यान रविंद्र चव्हाण यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे ७ कोटी ६४ लाख जंगम मालमत्ता आणि ४ कोटी ३२ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. या दोन्हींचा विकासाचा आणि बांधकाम खर्च मिळून रविंद्र चव्हाण यांच्याकडे एकूण १५ कोटी ३७ लाख रुपयांची स्वयंसंपादित मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे ९ कोटी १२ लाख रुपयांची संपत्ती आहे. चव्हाण यांच्या नावे बँका आणि इतर बँकांचे मिळून १४ कोटी कर्ज आहे. त्यांच्याकडे ११ लाख रुपये आणि त्यांच्या पत्नीकडे ४७ लाख रुपय किमतीचे सोन्याचे दागिने आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT