मुंबई : पुढारी वृत्तसेवा
दिवंगत थोर उद्योगपती रतन टाटा यांच्या संपत्तीतील एक तृतीयांश हिस्सा टाटा यांचे विश्वासू मोहिनी मोहन दत्ता यांना मिळणार आहे.
टाटा समूहाच्या ताज हॉटेल्समध्ये माजी संचालक असलेल्या व रतन टाटांचे अनेक वर्षांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणार्या मोहिनी मोहन दत्ता यांनी टाटा यांच्या मृत्युपत्रातील अटी मान्य केल्या आहेत. टाटांच्या मृत्युपत्रानुसार मोहिनी दत्ता यांना टाटांच्या उरलेल्या संपत्तीपैकी एक तृतीयांश हिस्सा म्हणजेच सुमारे 588 कोटी मिळणार आहेत. टाटा हे 3900 कोटींची संपत्ती मागे ठेवून गेले होते.
रतन टाटा आणि मोहिनी दत्तांमधील संबंध तब्बल 60 वर्षांचा आहे. अवघ्या तेरा वर्षांचे असताना जमशेदपूरच्या डीलर्स होस्टेलमध्ये दत्तांची टाटांशी पहिली भेट झाली होती. टाटा त्यावेळी 25 वर्षांचे होते. त्यानंतर दत्ता मुंबईत आले आणि कुलाबा येथे ‘बख्तावर’ निवासस्थानी टाटांसोबत राहिले.
दत्तांनी ताज ट्रॅव्हल डेस्कपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर 1986 मध्ये टाटा इंडस्ट्रीजच्या मदतीने त्यांनी स्टॅलियन ट्रॅव्हल सर्व्हिसेस सुरू केली. 2006 मध्ये ही कंपनी ताज हॉटेल्सच्या उपकंपनीमध्ये विलीन झाली. पुढे दत्ता हे इंडिट्रॅव्हल या नव्याने स्थापन झालेल्या कंपनीचे संचालक बनले.