मुंबई : सहजासहजी साफ न होणाऱ्या गुटखा, तंबाखू आणि पान मसाल्याच्या थुंकीचे डाग दूर करण्यासाठी पश्चिम रेल्वेने अभिनव अशा जर्मन नॅनो-टेक्नॉलॉजीचे रंगकाम करण्याचे ठरवले आहे. ५ लाख रुपये खर्चाच्या या प्रायोगिक प्रकल्पा अंतर्गत माटुंगा रेल्वे स्थानकातील ८ ठिकाणी भिंती, खांब आणि धातूच्या पृष्ठभागांवर लाल रंगाचे हे रंगकाम करण्यात आले आहे. या लाल रंगामुळे साफसफाईचा वेळ ३० मिनिटांवरून ५ मिनिटांपर्यंत कमी होईल, असा दावा पश्चिम रेल्वेकडून करण्यात आला आहे.
मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या उपनगरीय रेल्वे सेवेच्या स्थानकांवर प्रवाशांकडून गुटखा आणि पान मसाला थुंकल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येचा मोठा सामना प्रशासनानाला करावा लागत आहे. नियमित साफसफाई करूनही भिंती, जिने आणि प्लॅटफॉर्मच्या भागांवर थुंकीचे डाग दिसत असतात. थुंकीचे हे डाग स्वच्छ करताना रेल्वे कर्मचाऱ्यांचे नाकेनऊ येतात. यावर अभिनय उपाय म्हणून जर्मन नॅनो-टेक्नॉलॉजीचे कोटिंग लावण्याचा प्रयोग पश्चिम रेल्वे करत आहे.
या प्रायोगिक प्रकल्पा अंतर्गत माटुंगा रेल्वे स्थानकातील भिंती, खांब आणि धातूच्या पृष्ठभागांवर लाल रंगाचे हे रंगकाम करण्यात आले आहे. जवळपास येथील ८ ठिकाणी एकूण ३,७०० चौरस फूट क्षेत्रफळावर हे नॅनो-कोटिंग लावण्यात आले आहे. हे कोटिंग ५ वर्षांपर्यंत टिकण्याची अपेक्षा आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जर्मन नॅनो-टेक्नॉलॉजीचे रंगकाम (कोटिंग) पृष्ठभागावर एक संरक्षक थर तयार करते. ज्यामुळे डाग,रंग आणि घाण पृष्ठभागाच्या आत झिरपत नाही. स्वच्छता कर्मचाऱ्यांना केवळ पाणी आणि साध्या साफसफाईने हे कठीण डाग वेगाने काढता येणार आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि थंडीत ही या रंगकामांमुळे साफसफाईचा वेळ ३० मिनिटांवरून ५ मिनिटांपर्यंत कमी होईल,असा दावा त्यांनी केला आहे.