Mumbai local train  file photo
मुंबई

Mumbai local train updates: मुंबई-पुणे रेल्वे घाट मार्गावर एक मार्गिका सुरू; पाहा मध्य, पश्चिम आणि हार्बरचे सर्व अपडेट्स

मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. पश्चिम रेल्वेने आतापर्यंत ३९ मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Mumbai local train updates

मुंबई: मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. पश्चिम रेल्वेने आतापर्यंत ३९ मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या असून, २०० हून अधिक लोकल फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. दरम्यान, मुंबई-पुणे रेल्वे घाट मार्गावर एक मार्गिका सुरू करण्यात आली आहे.

पुलावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प

काल सायंकाळी ७.२० ते आज सकाळी ६.५० या कालावधीत सुरतजवळील सचिन स्थानकाजवळ पुलावर पाणी साचले होते. सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गावरील मेल-एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती. दरम्यान, आज सकाळी पाणी ओसरल्यानंतर सकाळी ६.५० वाजल्यापासून लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

३९ मेल-एक्स्प्रेस रद्द, लोकल उशिराने

या परिस्थितीमुळे पश्चिम रेल्वेने आतापर्यंत ३९ मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच २१ गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या असून ४६ गाड्या पुनर्नियोजित करण्यात आल्या आहेत. चर्चगेट–विरार–डहाणू रोड मार्गावरील उपनगरीय लोकल सेवा सुरू असल्या तरी त्या काही प्रमाणात उशिराने धावत आहेत. काल मुसळधार पाऊस, रुळांवर पाणी साचणे आणि इतर मान्सूनसंबंधित कारणांमुळे २०० हून अधिक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या, ज्याचा फटका मुंबईकरांना बसला.

आज १२५ मिमी पावसाचा अंदाज; पूरस्थितीचा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज (८ जुलै) सकाळी १० ते रात्री ९ या कालावधीत वसई-विरार, सफाळे, वाडा, पालघर, बोईसर आणि डहाणू तालुक्यांत सुमारे १२५ मिमी इतक्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचून पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चर्चगेट ते वसई रोड दरम्यान रेल्वे वाहतूक सुरळीत

वसई-विरार विभागात पाऊस विखुरलेल्या स्वरूपात पडत असून, काल ३ ते ४ तासांत २३० ते २५० मिमी अतिवृष्टी झाल्याने काही ठिकाणी पाणी साचले. सध्या चर्चगेट ते वसई रोड दरम्यान रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. वसई रोड आणि नालासोपारा स्थानकांदरम्यान वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. दोन्ही स्थानकांवरील पाणी हळूहळू ओसरत असून, पाणी उपसण्यासाठी पंप कार्यरत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

मुंबई-पुणे रेल्वे घाट मार्गावर एक मार्गिका सुरू

मुंबई-पुणे रेल्वे घाट मार्गावर एक मार्गिका सुरू झाली आहे. मंकी हिल–ठाकूरवाडी दरम्यानच्या मिडलाईनवर रात्रीपासून वाहतूक सुरू आहे. या मार्गावर ताशी ३० किमी वेगमर्यादेसह गाड्या चालवल्या जात आहेत. घाटातील उर्वरित दोन मार्गिका अद्याप बंद आहेत. ४०० हून अधिक अधिकारी, अभियंते व कर्मचारी दुरुस्तीच्या कामात आहेत. १० ते १२ जेसीबींच्या सहाय्याने माती, दगड आणि झाडे हटविण्याचे काम सुरू आहे. ट्रॅक, ओएचई आणि सिग्नल यंत्रणेची तपासणी सुरूच आहे. उर्वरित मार्गिका सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत १४६ गाड्यांवर परिणाम झाला असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. हवामान अनुकूल राहिल्यास उर्वरित मार्गिकांवरील वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT