मुंबई

Deputy CM Ajit Pawar : ‘मुख्यमंत्र्यांपुढं आमचं काही चालत नाही’!

रणजित गायकवाड

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : Ajit Pawar : महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागातर्फे जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाराजी पाहायला मिळाली. ही त्यांनी नाराजी बोलूनही दाखवली.

कार्यक्रमातील निवेदिकेच्या सूचनांमुळे अजित पवार यांच्यासह सर्वच उपस्थितांना वारंवार खुर्चीवरुन उठ-बस करावी लागली. त्यामुळे याबाबत भाषणाच्या सुरवातीला अजित पवार यांनी मिश्किलपणे नाराजी व्यक्त केली.

ते म्हणाले, सुरुवातीपासून मी बारकाईने बघतोय. निवेदिकेने मुख्यमंत्र्यांना सारखं बसा-उठा करायला लावले. मुख्यमंत्री उठायचे त्यामुळे आम्हाला सुद्धा उठावे आणि बसावे लागत होते. एकदाचं सांगितलं असतं तर सर्व संपल असत. अन् मुख्यमंत्र्यांच्या पुढे आमचे काही चालत नाही, असे मिश्किलपणे आपले मत व्यक्त केले.

डेक्कन ओडिसी ट्रेनमध्ये मंत्रिमंडळ बैठक…

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. डेक्कन ओडिसी ट्रेनमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेतली जाणार असल्याचे त्यांनी आज सांगितले.

राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक डेक्कन ओडिसी रेल्वेमध्ये घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्याचवेळी ही बैठक वेळेत संपली पाहिजे. नाहीतर ही गाडी परत आली तरी आपली बैठक सुरूच राहील, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली.

जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. या खात्याचे मंत्री आपले पुत्र आदित्य ठाकरे हे असून आपल्याला त्यांचा अभिमान असल्याचे सांगत पर्यटन विभागाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पर्यटन विभागाकडे पूर्वी दुर्दैवाने कुणी लक्ष दिले नव्हते. पण आता पुढील काळात आपण महत्व देणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका पर्यटन व्यवसायाला बसला. पण अशा परिस्थितीत देखील या क्षेत्राने नवीन योजना, उपक्रम आणले आणि रोजगार दिला हे कौतुकास्पद आहे. देशातील 1200 लेण्यांपैकी महाराष्ट्रात 800 लेणी आहेत. पण आपल्याला खरोखरच या लेणी ठाऊक आहेत का? आपल्या पूर्वजांनी अप्रतिम लेणी खोदली, शिल्पे निर्माण केली. पण त्या काळातल्या सारखे दगडातून रेखीव शिल्प आज आपण निर्माण करू शकतो का? असा सवाल करताना आजच्या युगातली लेणी निर्माण करायला हवी, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कास पठारासारखी अनेक पठारे आपण शोधून आपण ती ठिकाणे लोकप्रिय करू शकतो. जुनं ते सोनं आहे आणि आपण ते जपतोय. पण नवीन सुद्धा निर्माण करण्याची हिम्मत आमच्यात आहे हे विसरून चालणार नाही, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील पर्यटनाचे वैभव जपा, जोपासा, वाढवा आणि हे करीत असतानाच पर्यटन क्षेत्रात स्वतःची शैली निर्माण करून जगभरातील पर्यटकांना आकर्षित करा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिह, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, पर्यटन संचालक मिलींद बोरीकर आदी उपस्थित होते. पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे कार्यक्रमाला ऑनलाइन उपस्थित होत्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT