मुंबई : प्रभाग आरक्षण सोडत म्हणजे एखाद्या उमेदवाराचे भवितव्य ठरवते किंवा त्याला राजकारणातून दूर लोटते. त्यामुळे निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळेल की नाही, यापेक्षा आपला प्रभाग आरक्षित होणार नाही, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे नगरसेवक बनू पाहणाऱ्या अनेकांनी देवाला आपला प्रभाग आरक्षित होऊ नये यासाठी साकडे घातले आहे.
मुंबईत अनेक जण कोकणातील असल्यामुळे काहींनी थेट आपल्या कोकणात जाऊन आपल्या ग्रामदेवता कुलदेवतेला नारळ ठेवून आपला प्रभाग आरक्षणात जाऊ नये, यासाठी गाऱ्हाणे घातले आहे.
प्रभाग आरक्षण ओबीसी उमेदवारांसह महिला उमेदवारांसाठी फायदेशीर आहे. आरक्षणातील उमेदवार खुल्या प्रवर्गातही निवडणूक लढू शकतात. पण खुल्या प्रवर्गातील इच्छुकांना खुल्या प्रवर्गासाठी शिल्लक राहणाऱ्या 75 प्रभागांवरच अवलंबून राहावे लागणार आहे.
नागरिकांचा मागासवर्ग (ओबीसी) 27 टक्के जागा राखीव होणार आहेत. त्यामुळे ओबीसीसाठी 61 प्रभाग आरक्षित करण्यात येणार आहेत. यात 50 टक्के ओबीसी महिलांसाठी प्रभाग राखीव राहणार आहेत. 149 प्रभाग खुल्या प्रवर्गासाठी राहणार आहेत. यात 50 टक्के प्रभाग खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव करण्यात येणार आहेत. त्यामुळे खुल्या प्रवर्गासाठी 75 प्रभाग शिल्लक राहणार आहेत.
हे आरक्षण पूर्णपणे नव्याने काढण्यात येणार असल्यामुळे 2017 च्या निवडणुकीमध्ये आरक्षित असलेला प्रभाग नेमका यावेळी कोणत्या आरक्षणात जाईल की खुल्या प्रवर्गात राहील, याचा कोणीही अंदाज बांधू शकत नाही. या निवडणुकीसाठी 2017 मध्ये निवडून आलेले सर्वच माजी नगरसेवक पुन्हा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. पण प्रभाग आरक्षणामध्ये गेल्यास खुल्या प्रवर्गातील माजी नगरसेवकांचे राजकीय भवितव्य अडचणीत येेऊ शकते.
अशी असणार रूपरेषा
मंगळवार 11 नोव्हेंबर सकाळी 11 वाजता ‘बालगंधर्व रंगमंदिर, तळमजला, सभागृह, रस्ता क्रमांक 24 व 32 च्या नाक्याजवळ, नॅशनल महाविद्यालयासमोर, वांद्रे (पश्चिम) येथे आरक्षण सोडत
शुक्रवार 14 नोव्हेंबर आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात येईल.
शुक्रवार14 नोव्हेंबर ते गुरुवार 20 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत आरक्षण प्रारुपावर हरकती व सूचना सादर करता येतील.
हरकती व सूचना दाखल करण्यासाठी निवडणूक प्रभागाशी संबंधित कार्यालयाचा पत्ता मुंबई महानगरपालिका वेबसाईटवरील https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlBMCGE2025 या लिंकवर उपलब्ध आहे.