liver transplant Pudhari
मुंबई

Liver Transplant Mother Donation: बाल यकृत प्रत्यारोपणांम्धये ठरल्या जीवनदात्या

वाडिया रुग्णालयातील 16 प्रत्यारोपणांपैकी 70 टक्के यकृत दान आईकडूनच

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: ‌‘आई‌’ हा शब्दच मायेचा, त्यागाचा आणि नि:स्वार्थ प्रेमाचे प्रतीक मानला जातो. पण काही आई आपल्या लेकरांसाठी केवळ प्रेमच देत नाहीत, तर अक्षरशः स्वतःच्या शरीराचा तुकडाही देतात. वाडिया रुग्णालयात आतापर्यंत झालेल्या 16 बाल यकृत प्रत्यारोपणांपैकी जवळपास 70 टक्के प्रत्यारोपणांमध्ये आईंनी स्वतःच्या यकृताचा भाग दान करून आपल्या मुलांना नवजीवन दिले आहे.

देशभरात एंड-स्टेज लिव्हर डिसीजने ग्रस्त मुलांसाठी ‌‘लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट‌’ हा अनेकदा एकमेव पर्याय असतो. चिमुकल्यांची जगण्यासाठी सुरू असलेली धडपड आणि त्यांच्या शारीरिक-मानसिक वेदनांमुळे कुटुंब हतबल होते.

अशा परिस्थितीत कुटुंबातील व्यक्तीकडून यकृतदान झाल्यास प्रत्यारोपण प्रक्रिया अधिक वेगाने आणि तुलनेने कमी गुंतागुंतीची पार पडते. विशेष म्हणजे अशा प्रत्यारोपणांमध्ये आईंचा सहभाग सर्वाधिक असल्याचे चित्र समोर आले आहे. वाडिया रुग्णालयातील जवळपास 70 टक्के बाल यकृत प्रत्यारोपण हे त्या मुलांच्या आईंनी यकृतदान केल्यामुळे शक्य झाले. प्रत्येक प्रत्यारोपणामागे वैद्यकीय विज्ञानाबरोबरच आईची जिद्द, त्याग आणि लेकरासाठी काहीही करण्याची तयारी दिसून येते.

‌‘ माझ्या मुलाला वाचवायचं होतं... बाकी काही महत्त्वाचं नव्हतं‌’ 34 वर्षीय ज्योती विजय सिंह यांच्यासाठी आयुष्य अचानक बदलले, जेव्हा त्यांचा सहा वर्षांच्या मुलगा प्रियांशला सतत अशक्तपणा, पोट सुजणे, वजन घटणे आणि भूक मंदावणे अशी लक्षणे दिसू लागली. तपासणीनंतर त्याला ‌‘हेपॅटोब्लास्टोमा‌’ हा दुर्मिळ आणि आक्रमक यकृताचा कर्करोग असल्याचे स्पष्ट झाले.

केमोथेरपीनंतरही परिस्थिती गंभीरच राहिली. ट्यूमरची जागा अत्यंत गुंतागुंतीची असल्याने सामान्य शस्त्रक्रिया शक्य नव्हती. अखेर यकृत प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय उरला. स्वतःच्या लेकराला मृत्यूच्या दारातून परत आणण्यासाठी ज्योती यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या यकृताचा सुमारे 250 ग्रॅम भाग दान करण्याचा निर्णय घेतला.

तब्बल 10 तास चाललेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर प्रियांशला नवजीवन मिळाले. विशेष म्हणजे स्वतः शस्त्रक्रियेतून सावरत असतानाही ज्योती आज घर, कुटुंब आणि मुलाची जबाबदारी तितक्याच ताकदीने सांभाळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT