Vishwas Patil pudhari photo
मुंबई

Vishwas Patil |'एआय' पूर्णपणे भंपक; घाबरायची गरज नाही : विश्वास पाटील

जर तुम्हाला कोणत्याही कलाकृतीचा खऱ्या अर्थाने अस्सलपणा हवा असेल, तर पुस्तकांच्या आणि साहित्याच्या मुळाशीच जावे लागेल, असे परखड मत सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि साहित्यिक विश्वास पाटील यांनी येथे व्यक्त केले.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : डिजिटल आणि मोबाईल युगात 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा केवळ बागुलबुवा उभा केला जात आहे. 'एआय' हे पूर्णपणे भंपक असून, त्याला घाबरण्याची अजिबात गरज नाही; कारण त्यातून कोणतीही मौलिकता निर्माण होत नाही. जर तुम्हाला कोणत्याही कलाकृतीचा खऱ्या अर्थाने अस्सलपणा हवा असेल, तर पुस्तकांच्या आणि साहित्याच्या मुळाशीच जावे लागेल, असे परखड मत सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि साहित्यिक विश्वास पाटील यांनी येथे व्यक्त केले.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे सुरू असलेल्या 'मुंबई पुस्तक महोत्सव २०२६' मध्ये गुरुवार २६ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सत्रात 'कादंबरी लेखनाचा एक प्रयोग' या विशेष चर्चासत्रात संवादक तपस्या नेवे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. जगभरातील दर्जेदार साहित्याचे सखोल वाचन केल्याशिवाय लेखक किंवा वाचकाला साहित्यनिर्मितीचे नवे धागेदोरे सापडणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी ठामपणे स्पष्ट केले.

तुम्ही कोणत्याही क्षेत्रात करिअर करा; पण अभ्यासाचा ध्यास घेतल्याशिवाय यशाचे शिखर गाठणे शक्य होणार नाही. त्यासाठी पुस्तक वाचन तुमचा अनुभव आणि आत्मविश्वास अधिक बळकट करेल, असा कानमंत्र त्यांनी तंत्रज्ञान काळातील विद्यार्थ्यांना दिला आणि मानवी संवेदना आणि अस्सल वाचनसंस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले.

दरम्यान, भारतीय राज्यघटनेत २४ भाषांचा समावेश आहे. त्यापैकी मराठी आणि आसामी भाषिक लोक भाषेच्या मुद्द्यावर मोठ्या संख्येने एकत्र येतात. त्याचप्रमाणे देशातील इतरही भाषिकांनी एकत्र यायला हवे, असेही विश्वास पाटील यांनी यावेळी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT