मुंबई

Vishakha Raut: विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द; ठाकरे गटाला मोठा धक्का

बनावट ओबीसी जात प्रमाणपत्र प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले. मुंबई महापालिका सभागृहात महापौर रितू तावडे यांनी अधिकृत घोषणा केली.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: महापालिका निवडणुकीत जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द झाले.

मुंबई महापालिका सभागृहात सोमवारी महापौर रितू तावडे यांनी अधिकृत घोषणा केली. त्यामुळे ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दादर प्रभाग क्रमांक १११ मधून निवडून आलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या विशाखा राऊत यांचे ओबीसी प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार प्रिया गुरव-सरवणकर यांनी केली होती. यावर पालघर जिल्हा जात पडताळणी समितीमध्ये सुनावणी झाली असता, राऊत यांचे ओबीसी जातीचे प्रमाणपत्र रद्दबातल केले.

दरम्यान हायकोर्टातही राऊत यांची याचिका फेटाळल्यामुळे महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिवांना पत्राद्वारे राऊत यांचे नगरसेवक पद रद्द झाल्यासह त्या पुढील सहा वर्षे नगरसेवक पदाच्या निवडणूक लढवण्यास अपात्र असल्याचे कळवले होते.

त्यानुसार सोमवारी महापालिका सभागृहात राऊत यांचे पद रद्द झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने आतापर्यंत दोन नगरसेवक गमावले आहेत.

दादर या आपल्या बालेकिल्लातील ज्येष्ठ शिवसैनिक माजी महापौर यांनी नगरसेवक पद गमावल्यामुळे ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक माजी आमदार सदा सरवणकर यांची कन्या प्रिया गुरव यांचा पराभव केला होता.

दरम्यान आपले जातीचे प्रमाणपत्र बनावट नसून ओबीसी असल्याचे पुन्हा एकदा राऊत यांनी ठामपणे सांगितले आहे. त्यामुळे या विरोधात आपण न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुरव यांना नगरसेवक बनण्याची संधी

राऊत यांचे नगरसेवक पद रद्द झाल्यामुळे दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या या प्रिय गुरव यांना नगरसेवक बनण्याची संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्याबळही एकने वाढणार आहे.

सध्या शिवसेनेचे २९ नगरसेवक असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन नगरसेवक व शरद पवार गटाचा एक नगरसेवक शिवसेनेत सामील झाला आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ३३ होणार आहे.

सध्याचे पक्षीय बलाबल

भाजपा - ८८

शिवसेना - ३२

शिवसेना (ठाकरे गट) - ६३

काँग्रेस - २४

मनसे - ६

एमआयएम - ६

समाजवादी पार्टी - २

एकूण - २२१

आतापर्यंत या नगरसेवकांनी पद गमावले

प्रभाग क्र. १११ दीपक सावंत (शिवसेना ठाकरे गट)

प्रभाग क्र. १३७ शमीर रमजान पटेल (एमआयएम)

प्रभाग क्र. १७० बुशरा कप्तान मलिक (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग क्र. १३८ रोशन शेख (एमआयएम)

प्रभाग क्र. १११ विशाखा राऊत (शिवसेना ठाकरे गट)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT