Vinod Tawde Pudhari
मुंबई

Vinod Tawde: भाजपच्या निवडणूक रणनीतीचा शिलेदार ते राष्‍ट्रीय महासचिव; विनोद तावडे सर्वाधिक महत्त्वाच्या उत्तर प्रदेशचे प्रभारी

२०१९ मध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर विनोद तावडे यांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होत बिहार निवडणुकीत भाजपला यश मिळवून दिले. आता उत्तर प्रदेशाचे प्रभारी म्हणून महत्त्वाची जबाबदारी.

पुढारी वृत्तसेवा

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई: देवेंद्र फडणवीस यांच्या २०१४ च्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री या पदावरून लक्षणीय कामगिरी करणाऱ्या नेत्याला अचानक २०१९ च्या निवडणुकीला सामोरे जाताना उमेदवारीच नाकारली गेली. हा कमालीचा धक्कादायक भाग होता.

पण पक्ष निर्णयाच्या विरोधात तक्रार तर सोडाच, ब्र ही न उच्चारता आदेश शिरसावंद्य मानत या नेत्याने पुढे वाटचाल सुरू ठेवली. महाराष्ट्राच्या राजकारणात न रमता पक्षनेत्यांनी सुचवल्याप्रमाणे ते केंद्रात जाऊन काम करत राहिले.

राष्ट्रपतिपदाची निवडणूक असो किंवा बिहार विधानसभा, त्यांची रणनीती पक्षाला अपेक्षित यश देत गेली आणि आज ते पुन्हा एकदा पक्षात महत्त्वाचे नेते ठरले. क्रमांक एकवर नाव असलेले महामंत्री आणि आता उत्तर प्रदेशाचे प्रभारी.

ही गोष्ट आहे विनोद तावडे यांची. राष्ट्रीय राजकारणात ते वावरायला लागले २०२० च्या आसपास. २०२२ साली बिहार निवडणुकांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली आणि केवळ एक वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी बिहारमध्ये जनता दल युनायटेड समवेत भाजपला विजयापर्यंत नेले.

त्यानंतर सातत्याने चंदीगडची महापौरपदाची निवडणूक असेल किंवा हरियाणा विधानसभा असेल किंवा उत्तर प्रदेश निवडणुकीत मदत, सोपवलेली जबाबदारी विनोद तावडे पार पाडत गेले. वसई विरार परिसरात निवडणुकीदरम्यान काही सामुग्री वाटली असे आरोप झाले . मात्र भाजप आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्यासमवेत ठामपणे उभे राहिले.

महाराष्ट्र हे त्यांचे कार्यक्षेत्र. ते पक्षाचे वाईट दिवस असतानाचे बिनीचे शिलेदार. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते. पण "राज्यातील राजकारणापासून दूर राहा" या पक्षादेशाचे त्यांनी तंतोतंत पालन केले. राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक झाली तेव्हा द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी मतांची व्युहरचना करणे तसेच त्यानंतर यासारख्या अनेक कठीण प्रसंगात, कामात तावडे अत्यंत शांतपणे स्वतःचे योगदान देत राहिले.

केरळ या भारतीय जनता पक्षासाठी आव्हान असलेल्या राज्यातही तावडे यांनी यशस्वी मोहीम राबवून विधानसभेत कमळाचा प्रवेश घडवून आणला. गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि तत्कालीन अध्यक्ष भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा जे काम देतील ते आपल्याला पक्षात काय मिळाले किंवा आपल्याला काय हवे होते याबद्दल कोणतीही तक्रार न करता पक्षाच्या कामात झोकून देणाऱ्या विनोद तावडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिले जाणार अशीही चर्चा होती. मात्र सध्या संघटनेत काम करणे हीच आपली इच्छा असल्याचे त्यांनी नुकतेच केंद्रीय नेतृत्वाच्या कानावर घातले होते असे म्हणतात.

त्यांना तथास्तु म्हणत पुन्हा एकदा महासचिव करण्यात आले आहे. महासचिवांच्या नेमणुकीमध्ये या वेळी माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा समावेश झाला आहे. तरी या पदावर सलग दुसरी टर्म मिळणाऱ्या विनोद तावडे यांच्यावर आगामी काळात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या येतील हे सरळ आहे.

भारतीय जनता पक्षाला गेल्या बारा वर्षांनंतर प्रथमच राजकीय आव्हानांचा सामना करावा लागेल असे वाटत असताना त्यांच्यावर सोपवली गेलेली जबाबदारी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे. १५ ऑगस्ट रोजी तावडे मुंबईत आले होते आता मात्र ते दिल्लीतच आहेत.

मुंबईत त्यांच्या मूळ कार्यक्षेत्रात केव्हा येणार या विचारणेवर त्यांनी अत्यंत शांतपणे चाहत्यांना " पक्षादेश होईल तेव्हा, सध्या काही महत्त्वाची कामे आहेत, मुंबईत येणे हे तेवढे महत्त्वाचे नाही" असे सांगितले.

उत्तर प्रदेशातील निवडणूक २०२७ च्या प्रारंभी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होईल. ती डिसेंबर २०२६ मध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. जंतरमंतर नंतर मात्र वातावरण बदलले आहे. त्यामुळे पुढे काय हा प्रश्न आहे.

उत्तरप्रदेश ठरू नये प्रश्नप्रदेश

महाराष्ट्रातल्या दौऱ्यांमध्ये विनोद तावडे उत्तर प्रदेशातील परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहेत याची कल्पना येत असे. उत्तर प्रदेशातील जातीपातीचे राजकारण,तेथे प्रदेशाध्यक्षपदी नेमल्या गेलेल्या व्यक्तीची निवड, योगी यांची लोकप्रियता आणि पक्षासमोरची आव्हाने याचा वेध तावडेंच्या बोलण्यात सातत्याने येत असे.

कदाचित उत्तर प्रदेशचा अभ्यास करा असे त्यांना पक्ष नेतृत्वाने सांगितले असावे पश्चिम बंगालच्या निवडणुकातही तावडे यांच्या कार्यकर्त्यांना त्यांना मुख्य प्रभारी नेमले जाईल असे वाटत होते मात्र त्यावेळी जी जबाबदारी मिळाली नाही ती आता उत्तर प्रदेश या सर्वाधिक कठीण निवडणुकीत मिळण्याची शक्यता प्रत्यक्षात आलेली आहे. ८० खासदार निवडून देणारा उत्तर प्रदेश सध्या वातावरण बदलले असताना भाजपसाठी प्रश्नप्रदेश ठरू नये हे आता तावडे यांना बघावे लागेल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT