Vinayak Raut family case Pudhari
मुंबई

Vinayak Raut Family Case: पाच कोटींसह टेरेस फ्लॅट न दिल्याने सुनेकडून तक्रार; माजी खासदार विनायक राऊत

न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वासही विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात त्यांच्या सुनेने केलेले कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप राऊत यांनी फेटाळून लावले आहेत. हिंसाचारासह बुवाबाजीचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावतानाच टेरेस फ्लॅट, ऑटोमेटिक गाडीसह पाच कोटींची मागणी मान्य न केल्यानेच सुनेकडून तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा विनायक राऊत यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना केला.

विनायक राऊत यांच्या सुनेने पतीसह सासरच्या मंडळींविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली. त्यानंतर राऊत यांनी माध्यमांसोर येत आपली बाजू ठेवली. या प्रकरणात यापूर्वी दोन्ही बाजूच्या वकिलांची तडजोडीसाठी बैठका झाल्या होत्या.

त्यावेळी सुनेने पाच कोटींच्या रकमेसह तीन बीएचकेचा टेरेस फ्लॅट, ॲटोमेटिक चारचाकी गाडीसह दरमहा दोन लाखांची मागणी केली होती. तक्रारदार सून ही ३ वर्षांपासून पतीसोबत राहात नसल्याचेही राऊत यांनी सांगितले.

आताच्या तक्रार आणि नोटीसमध्येही सुनेने एकूण १२ कोटींच्या रकमेसह फ्लॅट व दरमहा पाच लाखांच्या रकमेची मागणी केल्याचे राऊत म्हणाले. २०१८ ते २२ दरम्यान घरात जे अघोरी कृत्य केले जात होते त्यावेळी तिचे आई-वडीलही सोबत असल्याचे तिनेच नमूद केले आहे.

मग, इतकी वर्षे गप्प राहून अचानक २०२६ मध्येच तक्रार दाखल करण्याचे कारण काय? त्यांनी तेव्हाच तक्रार का केली नाही, असे प्रश्न करत यामागे काहीतरी षड्‌यंत्र आहे, आम्ही अघोरी उपाय केलेले नाहीत तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून या महिन्यात सुनावणी आहे. न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वासही विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT