मुंबई: विधान परिषद निवडणुकीत पुण्यात निष्ठावंतांना डावलून अजित पवार राष्ट्रवादीने ऐनवेळी पक्षात आलेल्या विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्याने नाराजी आहे. पार्थ पवार यांचा शब्द यासाठी अखेरचा ठरला. पक्षावर त्यांची पकड अधोरेखित झाली आहे.
पुण्यात ऐनवेळी काकडेंना उमेदवारी; टिंगरेंना डावलल्याने नाराजी
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्यानंतर तिथे पक्षांतर्गत पेच निर्माण झाला होता. माजी आमदार तसेच अजित पवार यांचे निष्ठावंत मानले जाणारे सुनील टिंगरे यांच्यासाठी पक्षातील आमदारांची मोठी फळी आग्रही होती. सुनेत्रा पवार यांच्या ‘जिजाई’ बंगल्यावर यासाठी आमदारांची बैठकही पार पडली.
मात्र, या सर्व प्रक्रियेत पार्थ पवार यांचा शब्द अंतिम ठरल्याचे पाहायला मिळाले. पार्थ पवारांचे बालमित्र आणि माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांनी ऐनवेळी वडील संजय काकडेंसह राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि पक्षाची उमेदवारी मिळवली. पक्षासाठी योगदान देणाऱ्या टिंगरेंना डावलून ऐनवेळी पक्षात आलेल्या काकडेंना उमेदवारी दिल्याने निष्ठावंतांमध्ये तीव्र नाराजी आहे.
महायुतीच्या जागावाटपात छत्रपती संभाजीनगर-जालन्याची जागा भाजपच्या वाट्याला गेली आणि भाजपने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली. मात्र यामुळे स्थानिक शिवसैनिकांमधील असंतोष हेरत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार यांनी थेट भाजप उमेदवाराविरोधात येथे महाविकास आघाडीकडून उबाठाचा उमेदवार आणि एमआयएमदेखील रिंगणात असल्याने लढत रंगतदार होणार आहे. या उमेदवारीवरून अब्दुल सत्तार आणि मंत्री अतुल सावे यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
नाशिकला भाजपने शिवसेनेविरोधात दंड थोपटले
नाशिकची जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाली. त्यांनी माजी आमदार नरेंद्र दराडे यांना पुन्हा उमेदवारी दिली. मात्र, जागावाटपाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच भाजपचे नेते गणेश गीते यांनी पक्षाकडून आणि अपक्ष असे दोन स्वतंत्र अर्ज दाखल करून बंडखोरी केली.
अमरावतीत भाजपविरोधात शिवसेनेची बंडखोरी
असाच प्रकार अमरावतीत घडला असून तिथे भाजपचे अधिकृत उमेदवार प्रवीण पोटे यांच्या विरोधात शिवसेनेचे विप्लव बाजोरीया यांनी अपक्ष म्हणून शड्डू ठोकल्याने अमरावतीतही महायुती समोरासमोर आली आहे.
RCOM Loan Fraud Case: आरकॉमचे माजी प्रमुख झुनझुनवाला यांना अटक करण्यास मंजुरीमंत्री जयकुमार गोरेंच्या भावाची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद
सांगली-सातारा मतदारसंघात भाजपने धैर्यशील कदम यांना उमेदवारी जाहीर केल्याने माण-खटावचे प्रबळ दावेदार आणि मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे नाराज झाले आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून ‘साहेब, मी नक्की कुठे चुकलो?’ असा भावनिक प्रश्न केला आहे. गेल्या 13 वर्षांचा राजकीय संघर्ष संपवून आणि भाजप उमेदवाराला विधानसभेत ताकदीने निवडून आणूनही पक्षाने आपला शब्द पाळला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
सांगली-साताऱ्यात शिवसेनेचा अर्ज
या मतदारसंघात भाजपच्या धैर्यशील कदम यांच्या विरोधात शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांनीही अर्ज भरल्याने साताऱ्यात तिरंगी आणि गुंतागुंतीची लढत पाहायला मिळत आहे. आता 4 जून रोजी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत महायुतीचे नेते या बंडखोरांना शांत करण्यात यशस्वी होतात की बंडखोरी कायम राहते, यावरच निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.