मुंबई : आयव्हीएफ फसवणुकीप्रकरणी निर्माता दिग्दर्शक विक्रम भट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी भट या दोघांना राजस्थान पोलिसांनी अटक केली. ट्रान्झिट रिमांड घेतल्यानंतर या दोघांनाही पुढील कारवाईसाठी राजस्थानला नेण्यात आले आहे. गेल्याच महिन्यांत विक्रम भट यांच्यासह सहा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर बायोपिकसाठी घेतलेल्या तीस कोटींचा अपहार करून फसवणूक केल्याचा आरोप आहे.
राजस्थानचे रहिवासी असलेले अजय मुरदिया व्यवसायाने डॉक्टर असून त्यांचे इंदिरा आयव्हीएफ नावाचे एक रुग्णालय आहे. त्यांच्या दिवंगत पत्नीच्या बायोपिकसंदर्भात त्यांची विक्रम भट यांच्यासह इतर सहा जणांसोबत एक मीटिंग झाली होती. त्यात त्यांच्या पत्नीच्या नावावरील चित्रपटासाठी त्यांनी अर्थसाहाय्य करावे. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना किमान दोनशे कोटींचा फायदा होईल, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर चर्चेनंतर विक्रम भट यांनी त्यांची पत्नी श्वेतांबरीच्या नावाने एक कंपनी सुरू केली होती. या कंपनीच्या बँक खात्यात चित्रपट निर्मितीसाठी तीस कोटी रुपये ट्रान्स्फर झाले होते. मात्र त्यांनी चित्रपट निर्मिती न करता या पैशांचा अपहार करून फसवणूक केल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी अजय मुरदिया यांनी स्थानिक न्यायालयात एक याचिका सादर करून भोपाळपुरा पोलिसांत संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर निर्माता-दिग्दर्शक विक्रम भट, त्यांची पत्नी श्वेतांबरी विक्रम भट, मुलगी कृष्णा विक्रम भट,उदयपूरचे सहेलीनगरचे दिनेश कटारिया, ठाण्याचे निर्माता मेहबूब अन्सारी, दिल्लीतील रहिवासी मुदित बुट्टन, डीएससी अध्यक्ष गंगेश्वरलाल श्रीवास्तव आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे सरचिटणीस अशोक दुबे यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यांत या सर्वांवर लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. तसेच त्यांना 8 डिसेंबरपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. लुक आऊटनंतर उदयपूर पोलिसांचे एक विशेष पथक शनिवारी मुंबईत आले होते. या पथकाने वर्सोवा पोलिसांच्या मदतीने विक्रम भट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी भट यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्यांना वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने ट्रान्झिट रिमांड मंजूर केला होता. त्यामुळे या दोघांना पुढील चौकशीसाठी राजस्थानात नेण्यात आले आहे.या वृत्ताला वर्सोवा पोलिसांकडून दुजोरा देण्यात आला.