Vikhroli Flyover : विक्रोळी उड्डाणपुलाचे काम अखेर पूर्ण File Photo
मुंबई

Vikhroli Flyover : विक्रोळी उड्डाणपुलाचे काम अखेर पूर्ण

मुंबईकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार; 30 मिनिटांची होईल बचत

पुढारी वृत्तसेवा

Vikhroli flyover work finally completed

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

विक्रोळी येथील उड्डाणपुलाचे काम तब्बल पाच वर्षानंतर पूर्ण होत असून लवकरच तो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. रेल्वे फाटक ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी मुंबई महापालिका आणि रेल्वेच्यावतीने फाटक बंद करून विक्रोळी उड्डाणपुलाची उभारणी सुरू केली होती. या उड्डाणपुलाचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

या उड्डाणपुलामुळे पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील रेल्वे मार्गावरून जाणारी पूर्व-पश्चिम बाजू जोडली जाणार आहे. तसेच या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पूर्व परिसरातील पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत. त्यामुळे प्रवास वेळेत सुमारे 30 मिनिटांची बचत होणार आहे.

असा तयार झाला उड्डाणपूल

विक्रोळी रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या पुलाची एकूण रुंदी 12 मीटर, तर लांबी 615 मीटर इतकी आहे. त्यापैकी 565 मीटरची उभारणी मुंबई महानगरपालिकेने केली आहे. तसेच उर्वरित 50 मीटर लांबीपर्यंतची उभारणी मध्ये रेल्वेकडून करण्यात आली आहे.

रेल्वे विभागाकडून एकूण 7 तुळ्या स्थापित करण्यात आल्या असून त्यांचे एकूण वजन 655 टन आहे. या पुलावर महानगरपालिकेने टाकलेल्या तुळया सुमारे 2142 टन इतक्या वजनाच्या आहेत. तसेच या तुळयांची लांबी 25 ते 30 मीटर इतकी आहे.

पुलाच्या तीन टप्प्यांत एकूण 18 तुळया टाकण्यात आल्या आहेत. या पुलाच्या एकूण 19 स्तंभांपैकी पूर्वेकडील बाजूस 12, तर पश्चिमेकडील बाजूस 7 स्तंभ उभारले आहेत.

पुलाच्या दोन्ही बाजूचे पोहोच रस्ते मार्गिकांवरील काँक्रिट, मास्टिक, ध्वनिरोधक, अपघातरोधक अडथळा आदी कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

उर्वरित कामे दोन दिवसांत पूर्ण करणार

येत्या दोन दिवसांत एका बाजूकडील ध्वनिरोधक, रंगकाम आणि पश्चिमेकडील बाजूवर मार्ग रेषा आखणी आदी कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच सध्या वाहतूक बेट उभारण्यात येत आहे. वाहतूक दिवे अर्थात सिग्नल बसवायचे काम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT