

Demolition of Prabhadevi Bridge postponed np88
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
वरळी-शिवडी जोडरस्त्याच्या बांधकामात अडथळा ठरणार्या प्रभादेवी पुलाचे पाडकाम लांबणीवर पडले आहे. 19 इमारतींच्या पुनर्विकासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची नियुक्ती आवश्यक असून याबाबतचा निर्णय नगरविकास विभाग घेणार आहे. पुनर्विकासाचा निर्णय होत नाही तोपर्यंत प्रभादेवी पुलाचा तिढा कायम राहण्याची शक्यता आहे.
अटल सेतूवरून थेट वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडणार्या वरळी-शिवडी उन्नत जोडरस्त्यासाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल तोडण्यात येणार आहे. यात 19 इमारती बाधित होणार होत्या. दरम्यानच्या काळात पुलाच्या आरेखनात बदल होऊन 17 इमारती वाचवण्यात आल्या. हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या दोनच इमारती आता बाधित होणार आहेत; मात्र पुलाच्या कामादरम्यान उर्वरीत 17 इमारतींनाही हादरे बसण्याची भीती रहिवाशांना आहे. सर्व 19 इमारतींतील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबतचे ठोस धोरण तयार होत नाही तोपर्यंत पूल बंद करू देणार नाही, अशी भूमिका घेत रहिवाशांनी पुलाचे पाडकाम थांबवले होते.
एप्रिलच्या अखेरीस झालेल्या बैठकीत सर्व इमारतींच्या पुनर्वसनाबाबत निर्णय घेण्यात आला. हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास इमारतींतील रहिवाशांना कुर्ला संक्रमण शिबिरात पाठवले जाईल. दरम्यान, एमएमआरडीए 17 इमारतींचा त्याच ठिकाणी खासगी विकासकाच्या जागेवर पुनर्विकास करेल. संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे पुनर्विकसित इमारतींमध्ये पुनर्वसन केले जाईल. हा प्रकल्प दोन ते अडीच वर्षांत पूर्ण होईल, असे बैठकीत ठरले होते.
एमएमआरडीएला 19 इमारतींच्या पुनर्विकासाची जबाबदारी द्यायची असेल तर त्यांची अधिकृतरित्या नियुक्ती आवश्यक आहे. हा निर्णय नगरविकास विभागाच्या हाती आहे. जोपर्यंत तसा निर्णय होत नाही तोपर्यंत प्रभादेवी पुलाचे पाडकाम लांबणीवर पडले आहे. परिणामी, वरळी-शिवडी उन्नत जोडरस्त्याचे कामही रखडले आहे.