Vijaypat Singhania Raymond chairman
मुंबई: प्रसिद्ध उद्योजक, रेमंडला जागतिक दर्जावर घेऊन जाणारे 'रेमंड' समूहाचे माजी अध्यक्ष, पद्मभूषण पुरस्कार विजेते विजयपत सिंघानिया यांचे शनिवारी मुंबई येथे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. एक दूरदृष्टी असलेले उद्योगपती, दानशूर व्यक्तिमत्व आणि धाडसी वैमानिक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने उद्योग आणि विमान वाहतूक क्षेत्रातील एका मोठ्या पर्वाचा अस्त झाला आहे.
सिंघानिया कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (दि. २९) दुपारी १:३० वाजता मुंबईतील एल.डी. रुपारेल मार्ग येथील 'हवेली' येथे अंत्यदर्शन सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी ३:०० वाजता चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांचे पुत्र आणि रेमंड समूहाचे विद्यमान अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांनी 'X' वर पोस्ट करत आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली.
१९३० च्या दशकात जन्मलेल्या विजयपत सिंघानिया यांनी रेमंड समूहाला जागतिक स्तरावर नेण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली रेमंड हा कापड उद्योगातील एक प्रस्थापित ब्रँड बनला. उद्योगाव्यतिरिक्त त्यांनी सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले. त्यांना विमान उड्डाणाची प्रचंड आवड होती. त्यांनी हॉट एअर बलूनमधून सर्वाधिक उंचीवर जाण्याचा जागतिक विक्रम केला होता. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना मानद 'एअर कमोडोर' पदवी देण्यात आली होती. उद्योग आणि समाजातील योगदानाबद्दल केंद्र सरकारने त्यांना 'पद्मभूषण' या पुरस्काराने गौरविले होते. जवळपास दोन दशके रेमंडची धुरा सांभाळल्यानंतर, २००० मध्ये त्यांनी ही जबाबदारी पुत्र गौतम सिंघानिया यांच्याकडे सोपवली होती.