PM Narendra Modi | सामूहिक शक्तीनेच विकसित भारत शक्य

पंतप्रधान मोदींचे आवाहन; जागतिक संकटात भारताच्या हिताला प्राधान्य देण्याचा पुनरुच्चार
Jewar airport inauguration
जेवार येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडले. यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि नागरी विमान वाहतूकमंत्री के. राम मोहन नायडू उपस्थित होते.-
Published on
Updated on

नोएडा (वृत्तसंस्था); पीटीआय : देशासमोर सध्या अनेक जागतिक आव्हाने आहेत; मात्र या संकटाच्या काळातही केंद्र सरकारचे प्राधान्य हे भारतातील कुटुंबे आणि शेतकर्‍यांच्या हिताचे रक्षण करणे हेच आहे. 140 कोटी देशवासीयांनी जेव्हा एकजूट आणि समर्पणाने प्रयत्न केले, तरच विकसित भारत हे स्वप्न साकार होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. जेवार येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि नागरी विमान वाहतूकमंत्री किंजरापू राम मोहन नायडू उपस्थित होते.

जागतिक संकटाचा धैर्याने सामना

पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधान म्हणाले, हे एक जागतिक संकट आहे; परंतु आपण शांतता, संयम आणि एकतेने याचा सामना केला पाहिजे. भारताचे हित जोपासणे हीच आपली सर्वात मोठी शक्ती आहे. यासंदर्भात संसदेत आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी माझी सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली आहे. राजकीय पक्षांनी अशा संवेदनशील काळात बेजबाबदार विधाने टाळावीत, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

विरोधकांवर निशाणा

समाजवादी पक्षावर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, पूर्वीच्या सरकारने नोएडाला भ्रष्टाचाराचे एटीएम बनवले होते; परंतु भाजपच्या काळात हे शहर विकासाचे शक्तिस्थान बनले आहे. ज्यांनी कोरोना काळात लसीबद्दल संभ्रम निर्माण केला, त्यांना जनतेने निवडणुकीत चोख प्रत्युत्तर दिले आहे.

उड्डाण योजनेचा विस्तार : मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणार्‍या दरात विमान प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने 29,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आतापर्यंत 1.6 कोटी लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

क्षेत्रात क्रांती : पूर्वी 85 टक्के विमानांची दुरुस्ती परदेशात करावी लागायची. आता जेवारमध्येच मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हरहॉल सुविधा सुरू झाल्याने भारत या क्षेत्रात आत्मनिर्भर होत आहे.

दळणवळणात मोठी गुंतवणूक : गेल्या 11 वर्षांत पायाभूत सुविधांच्या बजेटमध्ये सहापट वाढ झाली असून 17 लाख कोटी रुपये खर्चून 1 लाख किलोमीटरहून अधिक महामार्ग बांधले गेले आहेत.

इथेनॉलमुळे परकीय चलन वाचले

ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या घामातून तयार झालेल्या इथेनॉलमुळे भारताचे कच्चे तेल आयातीवरील अवलंबित्व कमी झाले आहे. यामुळे देशाचे सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news