Ganesh Naik : वाघ-बिबट्यांची संख्या वाढली, सफारी सुरू करणार pudhari photo
मुंबई

Ganesh Naik : वाघ-बिबट्यांची संख्या वाढली, सफारी सुरू करणार

वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत माहिती

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : विदर्भात वाघांची तर राज्यातील इतर भागांत बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिकांकडून मागणी आल्यास विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. तर, प्रत्येक महसुली भागात बिबट्यांची सफारी करण्यात येईल. तसेच, इतर राज्यांच्या मागणीनंतर त्यांनाही बिबटे देण्यात येतील अशी माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली.

याबाबत काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी याबाबतचा प्रश्न केला होता. तर, किशोर जोरगेवार, विकास ठाकरे, कृष्णा खोपडे, राजेश पाडवी, सुलभा खोडके आदींनी उपप्रश्न विचारले. वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, चंद्रपूर वन विभागात गेल्या पाच ते सात वर्षांत वाघांची संख्या 100 वरून 450 पर्यंत वाढली आहे.

विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प उभारण्याचा विचार आहे. मात्र शहरी भागात असे प्रकल्प उभारणे शक्य नाही. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू होत असलेल्या अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वनविभाग सतर्क असून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या माध्यमातून संयुक्त वनव्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे.

वाढता मानव-वन्यजीव संघर्ष हा संपूर्ण महाराष्ट्रासाठीचा विषय आहे. वाघ व बिबटे या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना उपचारासाठी विशेष केंद्रे उभारण्यात आली असून, तिथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जात आहेत. संयुक्त वन व्यवस्थापनाद्वारे स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.

भविष्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खान्देश या भागांमध्येही व्याघ्र प्रकल्प व सफारी सुरू करण्याचा मानस व्यक्त करताना, वनविभागाचा सविस्तर आराखडा (डीपीआर) लवकरच सभागृहासमोर मांडण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT