Vasai Virar illegal construction scam ED Arrest
मुंबई : वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार हे शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे भाचेजावई असल्याने त्यांची मुद्दाम बदनामी करण्यात आली आहे. दादा भुसे हे शिंदे सेनेचे नेते आहेत. त्यातच भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत अंतर्गत वाद आहेत, म्हणून हे घडवलं गेले आहे, असा दावा करून पवार यांची अटक बेकायदेशीर आहे, असा आक्रमक युक्तिवाद पवार यांच्या वकिलांनी आज (दि.१४) केला.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह ४ जणांना ईडीने अटक केली आहे. ३० जुलै रोजी पवार यांच्या घरावर ईडीने धाड टाकली होती. या प्रकरणी विशेष पीएमएलए (PMLA) कोर्टात न्यायाधीश आर. बी. रोटे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.
ते पुढे म्हणाले की, अनिलकुमार पवार तपासात सहकार्य करीत असतानाही खोटे आरोप रचून त्यांना अटक केली आहे. ही ED ची मोडस ऑपरेंटी आहे. पवार यांच्यावर केलेल्या एकाही आरोपाबाबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पुरावा नाही. त्यामुळे 10 दिवस कोठडी देण्यात येऊ नये. या प्रकरणात कुणी एक व्यक्ती निर्णय किंवा मंजुरी देत नाही. अनेक डिपार्टमेंट कडून आलेल्या फाईल्सवर स्वाक्षरी केली जाते. ED ला यापूर्वीच आवश्यक ती सर्व कागदपत्रे दिली आहेत. बँक स्टेटमेंट, गुंतवणूक, शेती माहिती याबाबतची सर्व कागदपत्रे ED च्या ताब्यात आहेत.
अॅड. कविता पाटील यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, या गुन्ह्याचं मोठे गांभीर्य आहे. साखळी करून हा आर्थिक गुन्हा केला आहे. आर्थिक लाभासाठी अधिकार आणि कायद्याचा दुरुपयोग करण्यात आला आहे. या अधिकारी आणि ठेकेदार यांच्या चौकशीत अनिल पवार यांनी सहकार्य केलेले नाही. अनेक जणांचे यात आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. सखोल तपास करण्यासाठी संशयितांना 10 दिवसांची कोठडी मिळावी.