मुंबई : वंचित बहूजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना सीएसएमटी येथून ताब्यात घेऊन आझाद मैदानात आणले. त्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाईकरून या सर्वांना सोडून देण्यात आले. pudhari photo
मुंबई

VBA protest : ‘वंचित’चा सीएसएमटीवर रेल्वे रोकोचा प्रयत्न

पोलीस-कार्यकर्त्यांमध्ये झटापट; शेकडो कार्यकर्ते ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : दिल्ली येथील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीमार विरोधात आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. याचाच एक भाग म्हणून वंचितच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील (सीएसएमटी) प्लॅटफॉर्म क्रमांक एक येथे दुपारी लोकल रेल्वे अडवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी रेल्वे पोलीस व कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापट झाली. पोलीसांनी रेल्वे अडवणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलीस ठाण्याकडे स्वाधीन केले. त्यानंतर सर्वांना पोलीसांनी आझाद मैदानात आणण्यात आले. याप्रकाराने टर्मिनस येथील वातावरण काही काळ तणावपुर्ण बनले होते.

गुरुवारी दुपारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या नावाने घोषणा देत वरळी, कुलाबा, मुंबादेवी, शिवडी, मलबार हिल या भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फ्लॅटफाॅर्म क्रमांक एक येथे आले. तेथे उभे असलेली लोकल रेल्वे अडविण्याचा प्रयत्न केला. तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या रेल्वे पोलीसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. धरपकड करताना पोलीस व कार्यकर्ते यांच्यात यावेळी झटापट झाली.

अखेर पोलीसांनी मनोज मर्चंटे, राकेश कांबळे, समीर कांबळे, आकाश दोडके, सुशांत जाधव, ॲड प्रणाली कांबळे, वर्षा जाधव, सुजाता पोवार, अभय कासे, अशोक गरूड, किशोर शिंगे, संदेश शिंदे, अविनाश गायकवाड, संगीता अब्दुले , अश्विनी वाघमारे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते यांना ताब्यात घेतले. या सर्वांना आझाद मैदान पोलीस ठाण्याकडे स्वाधीन केले. त्यानंतर त्यांना आझाद मैदानात आणले.याठिकाणीही ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नावाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. थोड्यावेळाने ताब्यात घेतलेल्यांना पोलीसांनी सोडून दिले.

मुंबईतील विविध आंदोलनांत १५० हून अधिक आंदोलक ताब्यात

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद' दरम्यान मुंबईतील विविध भागांत आंदोलने करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरभर कडक बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलनादरम्यान १५० हून अधिक आंदोलकांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले, तर चुनाभट्टी आणि वडाळा पोलिस ठाण्यांत ५५ आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त (ऑपरेशन्स) अकबर पठाण यांनी दिली.

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, ट्रॉम्बे, साकीनाका, मालवणी, दहिसर, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), गोरेगाव, चारकोप, मानखुर्द, शिवडी आणि शिवाजी पार्क परिसरात आंदोलने करण्यात आली. या ठिकाणी जमलेल्या आंदोलकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ताब्यात घेतलेल्या आंदोलनकर्त्यांची सुटका करण्यात आली.

दरम्यान, चुनाभट्टी आणि वडाळा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन आणि इतर संबंधित कलमांखाली ४७ आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलिस ठाण्यांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT